नाट्यसंमेलनात सात ठरावांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

राज्यात कार्यरत असलेल्या ललित कला विभाग व नाट्यशास्त्र विभागांचे सबलीकरण करण्यासाठी शासनाने शैक्षणिक अनुदान संबंधित संस्थांना मिळावे, असा ठराव घेण्यात आला. शासनाचा सांस्कृतिक विभाग दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत असतो. या स्पर्धांच्या नियमावलीत बदल करावा, स्पर्धेच्या नियोजनासाठी स्थानिक नाट्य परिषद शाखेला समन्वयकाची जबाबदारी द्यावी.

उस्मानाबाद : राज्य सरकारकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन समितीमध्ये स्थानिक नाट्य परिषद शाखेचा प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, यासह सात ठराव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात मंजूर करण्यात आले. 

तीनदिवसीय मराठी नाट्यसंमेलनाच्या समारोपापूर्वी रविवारी (ता. 23) सायंकाळी खुले अधिवेशन घेण्यात आले. त्यात सात ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी 96 व्या नाट्यसंमेलनापासून या 97 व्या नाट्यसंमेलनापर्यंत रंगभूमीशी निगडित असलेल्या ज्या कलावंतांचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात नाट्यसंमेलन सहभागी असल्याचा ठराव घेण्यात आला. याशिवाय गेल्या वर्षभरात ज्या रंगकर्मींना सन्मान प्राप्त झाले, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

जिल्हापातळीवर शासनाची वृद्ध कलावंत मानधन समिती कार्यरत असून, कलावंतांनी जोडलेल्या कागदपत्रांसह नाट्य परिषदेचे शिफारसपत्र घेणे बंधनकारक करावे, या समितीवर स्थानिक नाट्य परिषद शाखेचा प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, असा ठराव घेण्यात आला. राज्यात महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती व शासनाच्या अन्य अधिकारात असलेल्या नाट्यगृहाच्या देखभाल, व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक नाट्य परिषद शाखेचा प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, असा ठराव घेण्यात आला.

राज्यात कार्यरत असलेल्या ललित कला विभाग व नाट्यशास्त्र विभागांचे सबलीकरण करण्यासाठी शासनाने शैक्षणिक अनुदान संबंधित संस्थांना मिळावे, असा ठराव घेण्यात आला. शासनाचा सांस्कृतिक विभाग दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत असतो. या स्पर्धांच्या नियमावलीत बदल करावा, स्पर्धेच्या नियोजनासाठी स्थानिक नाट्य परिषद शाखेला समन्वयकाची जबाबदारी द्यावी.

सहभागी स्पर्धकांना देय रक्कम संचालनालयाने त्वरित द्यावी. नाटक झाल्यावर परीक्षक व स्पर्धक कलावंतांमधील होणारी चर्चा घेण्यात येऊ नये, स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पूर्वीप्रमाणेच आठास एक याप्रमाणे नाटकांची निवड करावी. स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलाकारांचा दैनिक भत्ता द्यावा. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्यापेक्षा निर्मिती खर्चात वाढ करावी आदी ठराव घेण्यात आले.

वरील ठराव श्रीकांत भाके, शिवाजी शिंदे, संजयकुमार दळवी, मुकुंद पटवर्धन यांनी मांडले. या ठरावांना यशवंत पद्मगिरवार, अनिल कुलकर्णी, किशोर आयलवार, प्रा. सुनील चव्हाण, श्रीनिवास जरंडीकर यांनी अनुमोदन दिले.

Web Title: Akhil Bhartiya Natya Sammelan ends in Osmanabad