...तुम्ही फेसबुक फ्रेण्डचे शिकार तर नाही ना !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सुंदर मुलींचे फोटो पाहून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. अनोळखी मित्रांनी पाठविलेल्या लिंक्सवर क्लिक करू नका. असे केल्यास तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फेसबक वापरताना सावध राहावे.
- प्रवीण धुमाळ, सहाय्यक पाेलिस निरीक्षक, सायबर सेल

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना किंवा स्विकारताना राहा सावध; फेसबुकवर बनावट खात्यांचं जाळ

अकोला: फेसबुक हे दुरावलेल्या मित्रांना एकत्र आणण्याचं उत्तम माध्यम असून, अनेक नवे मित्रही जुळतात. त्यात मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट आली की, त्याचा विचार न करता बहुतांश युवक ती स्वीकारतात. पण, अशा रिक्वेस्ट स्वीकारताना आधी त्या खात्याची पडताळणी करा, अन्यथा तुम्ही देखील अनाेळखी ऑनलाइन मित्राचे शिकार होऊ शकता.

माहितीचं आदान प्रदान करणारं सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. याचाच एक घटक असलेलं फेसबुक हे माध्यम युवा मनावर राज करत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबतच ऑनलाईन मैत्रीचं जाळंही या माध्यमातून बळकट होतं आहे. या माध्यमातून जुन्या मित्रांसोबतच अनेक अनोळखी चेहरेही ऑनलाईन मैत्रीच्या बंधनात जुळतात अन् एक नवा सिलसिला सुरू होतो. त्यात एखाद्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट पाहताच बहुतांश युवक कुठलीही शहानिशा न करता ती स्विकारतात. पण, खरंच ते खात मुलीचं आहे का? याची पडताळणी देखील केली जात नाही. मैत्रीचं रुपांतर कालांतराने घट्ट होतं, तेव्हा अशा युवकांसमोर खरी पंचाईत येते. आणि आपली फसवणूक होत असल्याची जाणीव होऊ लागते. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तेव्हा अनोळखी व्यक्तीची विशेषतः अनोळखी मुलींच्या नावाने बनावट फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारताना त्याची पूर्ण खात्री करुन घ्या, अन्यथा तुम्ही देखील फसवल्या जाऊ शकता.

महिलेला लाखो रुपयांनी लुटले
अकोल्यातील एका महिलेची विदेशातील एका अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन मैत्री जमली होती. त्यांची ही मैत्र उपहार देण्यापर्यंत पोहोचली. लंडनच्या मित्राने पाठवलेल्या उपहाराला सोडविण्यासाठी महिलेला लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना नुकतीच अकोल्यात घडली आहे.

फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना...
कुठलीही अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना संबंधित व्यक्तिबद्दल माहिती घ्या. त्याची प्रोफाईल नक्की चेक करा. त्याची मॅन्युअल फ्रेंड लिस्टमध्ये आपले मित्र आहेत का? याची पळताळणी करा. यावरून समाधान झाल्यावरच संबंधित फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारा.

काय आहेत धोके?

  • तुमच्याशी मैत्री करून तुमची फसवणूक होऊ शकते.
  • मैत्रीच्या नावाखाली तुमची आर्थिक लुट होऊ शकते.
  • अनेकदा प्रेम भंग होऊन मानसीक संतुलन बिघडण्याची शक्यता असते.

(उदा. बनावट खात्याच्या माध्यमातून अनेक मुलांची अशी फसवणूक केली जाते. वास्तविक पाहता असे खाते मुलींची नसून मुलांचे असतात.)
तुमचं फेसबक खात हॅक होवू शकतं.

ही खबरदारी घ्या

  • तुमचं फेसबुक खातं सेटींगमध्ये जाऊन सुरक्षित करून घ्या.
  • फेसबुक खात्याचा पासवर्ड कुणाला शेअर करू नका.
  • वारंवार पासवर्ड बदलत राहा.
  • फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार करा.
Web Title: akola news facebook friend online cyber crime social media