आळंदचे प्राथमिक आरोग्य केंद्र बनले "रेफर सेंटर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

ळंद (ता. फुलंब्री) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असूनही रात्रीच्या वेळी डॉक्‍टर उपलब्ध राहत नसल्याने येथील कर्मचारी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना फुलंब्री, औरंगाबाद येथील रुग्णालयांत पाठवितात. सर्व सुविधा असूनही हे आरोग्य केंद्र "रेफर सेंटर' बनले आहे.

आळंद (जि.औरंगाबाद) : आळंद (ता. फुलंब्री) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असूनही रात्रीच्या वेळी डॉक्‍टर उपलब्ध राहत नसल्याने येथील कर्मचारी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना फुलंब्री, औरंगाबाद येथील रुग्णालयांत पाठवितात. सर्व सुविधा असूनही हे आरोग्य केंद्र "रेफर सेंटर' बनले आहे.

या आरोग्य केंद्रात आसपासच्या पंधरा-वीस गावांतील रुग्ण उपचारासाठी येतात. आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी उपस्थित नसतात. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. अपघात, सर्पदंश झालेल्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता अधिक असते. ता. 15 जुलै 2019 रोजी पहाटे पाचला पिंपरी येथील आरती पवार या मुलीस सर्पदंश झाल्याने तिच्या नातेवाइकांनी उपचारासाठी येथील आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी नसल्याने तिला उपचारासाठी खासगी दवाखान्यात न्यावे लागले. त्यात बराच वेळ गेला. खासगी डॉक्‍टरांनी उपचार करून पुढील उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, आरतीचा रस्त्यातच मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात घशात पेनाचे टोपण अडकलेल्या आळंद येथील मुलीला उपचारासाठी आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी नसल्याने औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल करावे लागले होते. उमरावती येथील कुशीवर्ता जाधव या महिलेस शनिवारी शेतात काम करताना सर्पदंश झाला. या महिलेस उपचारासाठी आळंदच्या आरोग्य केंद्रात आणले तेव्हा वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. आरोग्य केंद्रात एक महिला कर्मचारी व एक सेवक असे दोनच जण हजर होते. त्यांनी महिलेवर उपचार न करता औरंगाबादला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. बराच वेळ होऊनही उपचार होत नसल्याने महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले. त्यानंतर काही वेळाने कर्मचाऱ्याने प्राथमिक उपचार करून, औरंगाबादला नेण्याचा सल्ला दिला. आळंद येथील 108 रुग्णवाहिका उपलब्ध होती. पण त्या रुग्णवाहिकेचे डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका मिळाली नाही. तासाभरानंतर फुलंब्री येथील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. यात बराच वेळ जाऊन, महिलेची प्रकृती जास्त खालावली.
आरोग्य विभागाने रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले असतानाही ते तेथे राहत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावतात.

रुग्ण कल्याण समिती नावालाच
आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती नावालाच आहे. समितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, ग्रामस्थांचा समावेश आहे. मात्र, समितीचा वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नसल्याने ते केव्हाही येतात व जातात.

रिक्त पदांचा सिलसिला कायम
आरोग्य केंद्रातील बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्तच आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. रिक्त जागा भरण्याची मागणी रुग्ण व ग्रामस्थ यांनी केली आहे.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले आहेत. मंगळवारी येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मुख्यालयी राहण्याचे सांगण्यात येईल. त्यानंतरही जे गैरहजर आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- प्रसन्न भाले, तालुका आरोग्य अधिकारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aland Primary Health Centre Become Refer Center