SUNDAY SPECIAL : अट्टल दारूडेच करताहेत इतरांना दारूमुक्‍त

मधुकर कांबळे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

  • अल्कोहोलिक्‍स अॅनॉनिमसमुळे सोडली दोनशे जणांनी दारू 
  • मराठवाड्यात तब्बल एक हजार इतकी संख्या

औरंगाबाद - कधीकाळी सदैव दारूच्या नशेत असणारे, दारू पिऊन कुठेही बसकन मारणारे, कुठेही लोळणारे मद्यपी आता दारू किती वाईट आहे, ती पिणे बंद केल्याने माझ्या जीवनात काय बदल झाला, माझ्यापासून दुरावत जाणारे कुटुंब आता मला आपलेसे म्हणत आहे, असे इतरांना सांगून इतरांनीही दारूच्या पाशातून मुक्‍त व्हावे आणि एक सुखी-समाधानी
आणि आनंदी जीवन जगावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. अल्कोहोलिक्‍स ऍनॉनिमस (ए.ए.) औरंगाबादच्या सभांमधून शहरातील सुमारे 200 जणांनी दारूला दूर लोटले आहे, तर अशांची मराठवाड्यात तब्बल एक हजार इतकी संख्या आहे. 

अल्कोहोलिक्‍स ऍनॉनिमसची सुरवात कशी झाली, याविषयी एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले, की अतिरेकी मद्यपानामुळे निर्माण झालेल्या भयानक अवस्थेतून न्यूयॉर्कमधील एक स्टॉकब्रोकर बाहेर पडला होता. तशाच असहाय अवस्थेत असलेल्या ऍक्रॉन (ओहिओ) येथील एका सर्जनबरोबर त्याची भेट झाली. एका मद्यपीने स्वत:चे
अनुभव दुसऱ्या मद्यपीला सांगण्याच्या प्रक्रियेतून 10 जून 1935 मध्ये अमेरिकेत "ए. ए.'चा जन्म झाला आणि 5 मे 1957 मध्ये ही विश्‍वव्यापी संस्था भारतात सुरू झाली.

औरंगाबादमध्ये दररोज सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत ए.ए. व मद्यपींच्या कुटुंबीयांसाठी अल्‌ ऍनॉन या दोन्ही संस्थांच्या सभा होतात. सेंट फ्रान्सिस हायस्कूल जालना रोड, शिवाजी हायस्कूल खोकडपुरा, गुरू तेगबहादूर हायस्कूल उस्मानपुरा, बडी गिरणी महापालिका शाळा मिलकॉर्नर, अल्फान्सो हायस्कूल बजाजनगर वाळूज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पंचायत समितीजवळ सिल्लोड या ठिकाणी सोमवारपासून रविवारपर्यंत दररोज नियमित नियोजित वेळेत सभा होतात. 

Alcoholics Anonymous के लिए इमेज परिणाम
  
काय होते या सभांमध्ये? 
अल्कोहोलिक्‍स ऍनॉनिमसच्या नियमित सभांमध्ये मद्यपी अनुभव सांगतात. मद्यपानापूर्वी काय होतो, काय परिस्थिती होती आणि मद्यपानानंतर कशी परिस्थिती झाली. मद्यपानापासून सुटका करून घेतल्यानंतर माझ्या जीवनात काय बदल झाले, याविषयी मद्यपी अनुभव सांगतात. ज्यांना मद्यपान सोडायची इच्छा असते त्यांच्याकडून सर्वात आधी वीस प्रश्‍न असलेली माहिती भरून स्वत:च स्वत:ला प्रश्‍न विचारून स्वत:च त्याची उत्तरे द्यायला लावले जाते. या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार, असा प्रश्‍न निर्माण झाला तर उत्तर येते की या सर्वाला कोणीच जबाबदार नाही, तर मी स्वत: जबाबदार आहे.

यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हीच ठरवा, की तुम्हाला मद्यपानापासून मुक्‍ती हवी आहे का आणि हीच आहे ती
सायकोथेरपी. मद्यपानापासून कायमची सुटका करून घ्यायची असेल तर फक्‍त एकच काम करावे लागते की, फक्‍त आजचा दिवस प्यायचे नाही असे ठरवायचे. असा एक दिवस गेला की, दुसरा, तिसरा, चौथा असे करत करत फक्‍त आजचा दिवस प्यायचे नाही असेच म्हणत दारूपासून एक-एक दिवस दूर राहायचे असे करीत मराठवाड्यातील 1 हजार जणांनी तर
औरंगाबाद शहरातील सुमारे 200 जणांनी दारूपासून स्वत:ची सुटका करून घेतली असल्याचे सांगण्यात आले. 

 

ही समस्या  जाणवत असेल तर भेटा... 

  • दारू प्यायला बसल्यानंतर मर्यादा राहत नाही 
  • दारू नियंत्रितपणे पिता येत नाही 
  • दारू न पिणे ठरवूनसुद्धा जमत नाही 
  • दारू सारखी प्यावीशी वाटते 
  • दारू पिली नाही तर झोप येत नाही 
  • दारू पिली नाही तर हात-पाय थरथर कापतात 
  • तर संपर्क करा 9420270634 किंवा 7741041450, aaaurangabad@gmail.com वर    

हे वाचा : Video : अंधारून येताच सरोवरावरून उडतात राक्षसी जीव 

हे वाचले का? : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात...

महत्त्वाची बातमी :  दहावी पास आहात का? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcoholics Anonymous : Treatment for Alcohol Problems