डाळिंबाच्या सातशे झाडांवर कुऱ्हाड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

खुलताबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून, फळबागेसाठी पाणीच नसल्याने सालुखेडा (ता. खुलताबाद) येथील किशोर काळे यांनी डाळिंबाची सुमारे 700 झाडे शुक्रवारी (ता. चार) ट्रॅक्‍टरद्वारे तोडली आहेत. 

शेतकरी किशोर काळे यांनी 2013 ला डाळिंबाची लागवड केली. पाच वर्षे त्यांनी ही बाग जोपासली. तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्याने झाडे सांभाळणे कठीण झाले. यावरही उपाय म्हणून त्यांनी शेततळे केले. मात्र तेही जेमतेमच भरले. पाणीच नाही तर बाग सांभाळून काय उपयोग म्हणून त्यांनी ही बाग उद्‌ध्वस्त केली. त्यांना फळबाग योजनेचा लाभही मिळालेला नाही. दुसरीकडे गेल्या वर्षापासून भावही मिळत नसल्याने काळे कुटुंब त्रस्त झाले होते. तालुक्‍यात यंदा तर आणखीनच विदारक स्थिती असून खिर्डी, सुलतानपूर, भडजी, वेरूळ, पळसवाडी या गावांमधील फळबागांची स्थिती भयाणच आहे. त्या बागाही मोडीत काढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

तालुक्‍यात अनेक गावांत शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या. मात्र या फळांना ना स्थानिक बाजारपेठ, ना भाव. त्यामुळे या फळबागा पांढरा हत्ती सांभाळण्यासारख्याच ठरत आहेत. याबाबत शासनाने मदतीचा हात द्यावा. 
- किशोर काळे, शेतकरी 

Web Title: almost 700 trees of pomegranate destroyed because of drought