औरंगाबाद : महायुतीचे अंबादास दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडीची मते मोठ्या प्रमाणात वळवल्यामुळे अंबादास दानवे यांचा विक्रमी विजय झाल्याचे बोलले जाते. याशिवाय एमआयएम आणि अपक्ष मतदारांनी देखील अंबादास दानवे यांच्यात बाजूने आपला कौल दिल्यामुळे सुरुवातीला चुरसीची वाटणारी ही लढत एकतर्फी झाली . 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे हे विक्रमी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांना फक्त 104 मते मिळाली. एकूण झालेल्या 647 पैकी 13 मध्ये अवैध ठरली तर शहनावाज खान या अपक्ष उमेदवाराला आठ मते मिळाली. मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या.

अंबादास दानवे हे पाचही फेऱ्यात आघाडीवर होते. मतदानाचा अधिकृत निकाल अद्याप जाहीर व्हायचा असून शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे. शिवसेना-भाजप महायुतीकडे 333 तर काँग्रेसकडे 251 मतदार होते याशिवाय एमआयएम अपक्ष मिळून एकूण 657 मतदार या निवडणुकीत मतदान करणार होते. एकोणीस तारखेला यापैकी 647 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता .

सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडीची मते मोठ्या प्रमाणात वळवल्यामुळे अंबादास दानवे यांचा विक्रमी विजय झाल्याचे बोलले जाते. याशिवाय एमआयएम आणि अपक्ष मतदारांनी देखील अंबादास दानवे यांच्यात बाजूने आपला कौल दिल्यामुळे सुरुवातीला चुरसीची वाटणारी ही लढत एकतर्फी झाली . 

काँग्रेसने संख्याबळ राखता न आल्यामुळे ही निवडणूक मतदाना आधीच सोडल्याची चर्चा होती. अंबादास दानवे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री नेते तसेच भाजपच्या नेत्या व पदाधिकाऱ्यांनी देखील परिश्रम घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambadas Danve wins aurangabad legislative assembly election