चिमुकल्यासाठी 20 मिनिटांचा रस्ता पार केला अवघ्या दीड मिनिटांत, का? वाचा...

मधुकर कांबळे 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

अत्यवस्थ चिमुकल्याला रुग्णालयात पोचविण्यासाठी हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी मदत केली. त्यामुळे कुशलनगरपासून अवघ्या 1 मिनीट 31 सेकंदांत चिमुकला एमजीएम रुग्णालयात पोचला. 

औरंगाबाद - पंधरा दिवसांपासून कुशलनगरातील एका रुग्णालयात अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्याला एमजीएममध्ये संदर्भित करण्यात आले. कुशलनगरातील रुग्णालयातून अवघ्या अर्ध्या तासात एमजीएममध्ये त्याला दाखल करणे अतिआवश्‍यक होते; अन्यथा जिवाला धोका होता; मात्र ट्रॅफिकमुळे अडसर निर्माण झाला.अशा परिस्थितीत अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या सदस्यांनी संपूर्ण रस्ता ग्रीन कॉरिडॉर करून त्या चिमुकल्याला अवघ्या 1 मिनीट 31 सेकंदात एमजीएममध्ये पोचण्यासाठी जिवाची बाजी लावली. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्या चिमुकल्याच्या पालकांनी हेल्प रायडर्स नव्हे, तर देवदूत मदतीला धावून आल्याची भावना व्यक्‍त केली. 

अॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सचे समन्वयक ऍड. अक्षय बाहेती यांनी सांगितले, शनिवारी (ता. 29) अमित व्यवहारे यांचा फोन आला. त्यांचा अडीच वर्षांचा पुतण्या कुशलनगर येथील एका रुग्णालयात 15 दिवसांपासून उपचार घेत आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईहून डॉक्‍टर आलेले असून, फक्‍त अर्ध्या तासात बाळाला एमजीएममध्ये घेऊन जाणे अतिआववश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा फोन येताच पुढील 25 मिनिटांमध्ये हेल्प रायडर्स ग्रुपमधील रितेश जैन, भूषण कोळी, पवन भिसे, अमोल पाटील आणि मी माहिती घेऊन त्या चिमुकल्याच्या ऍम्ब्युलन्सला वेळेत एमजीएममध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारली.

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

आमच्यापैकी प्रत्येकाने एका एका सिग्नलवर उभे राहून ऍम्ब्युलन्सला वाट मोकळी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चौका-चौकात थांबलेले हेल्प रायडर्स, वाहतूक पोलिसांच्या नियोजनात ऍम्ब्युलन्सच्या पुढे एक हेल्प रायडर्स रस्ता मोकळा करत वेगाने निघाले. कुशलनगरपासून निघालेली ऍम्ब्युलन्स अमरप्रीत चौक, मोंढा नाका, आकाशवाणी चौक, सेव्हन हिल मार्गे एमजीएममध्ये दाखल झाली. केवळ 1 मिनीट 31 सेकंदात त्या चिमुकल्याला घेऊन अॅम्ब्युलन्स एमजीएम रुग्णालयात दाखल झाली आणि त्या चिमुकल्याच्या नातेवाइकांसह डॉक्‍टरांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

जाणून घ्या - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया
 
एरवी लागतात 20 मिनिटे 
एरवी कुशलनगर ते एमजीएमपर्यंत साधारणतः 20 मिनिटे वेळ लागतो; मात्र हेल्प रायडर्स आणि वाहतूक पोलिसांमुळे हे अंतर एवढ्या कमी वेळात पार करता आले. याबद्दल त्या चिमुकल्याच्या नातेवाइकांनी व कुटुंबीयांनी ऍड. अक्षय बाहेती, रितेश जैन, भूषण कोळी, पवन भिसे, अमोल पाटील या हेल्प रायडर्ससह वाहतूक पोलिस विभागाचे श्री. चव्हाण, श्री. गावंडे, श्री. वानेकर व श्री. गुरुभैये या सर्वांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance Arrived in Just a Minute For Him