‘ॲम्बुलन्स हेल्प रायडर्स’ चळवळीला मिळतोय पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

औरंगाबाद - रुग्णवाहिकेला गर्दीतून वाट सुकर करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘ॲम्बुलन्स हेल्प रायडर्स’ चळवळीला आता समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला आहे.

औरंगाबाद - रुग्णवाहिकेला गर्दीतून वाट सुकर करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘ॲम्बुलन्स हेल्प रायडर्स’ चळवळीला आता समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला आहे.

रायडर्सना प्रथमोपचाराचे मोफत प्रशिक्षण देण्याची तयारी एमजीएमने दर्शविली आहे. गुरुवारी (ता. २१) मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशन व एम. जी. एम. रुग्णालयात डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची भेट घेतली. चर्चेत त्यांनी ॲम्बुलन्स हेल्प रायडर्सला सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले. अपघातस्थळी किंवा एखाद्या रुग्णाला रुग्णालयात जाईपर्यंत आवश्‍यक ते नैसर्गिक उपचाराचे प्रशिक्षण आवश्‍यक असते. यातून  गंभीर जखमीचे प्राण वाचू शकतात. हेल्प रायडर्सना एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातून ते प्रशिक्षण मोफत देण्याची तयारी दर्शवली असल्याचे ॲड. अक्षय बाहेती यांनी सांगितले. 

अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल हेल्प रायडर्स चळवळीतील युवकांचे कौतुक केले. येत्या काही दिवसांत शहरात मोफत ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचेही जाहीर केले. महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने ॲम्बुलन्ससाठी रस्त्याची उजवी बाजू मोकळी करून देण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृती अभियानात हेल्प रायडर्सनाही सहभागी करून घेण्यात येईल, असे डॉ. सूर्यवंशी यांनी या चर्चेत स्पष्ट केले. बैठकीला संदीप कुलकर्णी, रणजित साळुंके, ॲड. अक्षय बाहेती, देवा मनगटे, रितेश जैन, अभिषेक कादी, ज्ञानेश्वर वाघमारे, अथर्व पुराणिक, सिद्धेश दुशी व अन्य हेल्प रायडर्स उपस्थित होते. 

काय करतील रायडर्स?
अपघातात जखमी किंवा अत्यवस्थ रुग्णांना नेताना ॲम्बुलन्सला गर्दीतून रस्ता मिळत नाही. अशा वेळी हेल्प रायडर्स त्या ॲम्बुलन्सला रस्ता मोकळा करून देण्यासाठी मदत करतील. अपघात झाल्यानंतर हेल्प रायडर्स घटनास्थळी पोचून ॲम्बुलन्स मागवतील आणि लवकरात लवकर जखमींना जवळच्या रुग्णालयात पाठवतील. ॲम्बुलन्स येईपर्यंत आवश्‍यक ते प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मोफत देण्यात येणार आहे. अक्षय बाहेती यांनी सांगितले, व्हॉट्‌सॲपचे दोन ग्रुप तयार केले आहेत. याशिवाय महिलांचा एक स्वतंत्र ग्रुप आहे. या ग्रुपवर अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळापासून जवळ असलेल्या हेल्प रायडर्सनी तिथे जाऊन मदत करण्याच्या सूचना केल्या जातील. ज्या रायडर्सनी मदत केली ते घटनास्थळाचे गुगल मॅपद्वारे लोकेशन आणि जखमीची पुढील व्यवस्था काय केली याबाबत ग्रुपवर रिप्लाय देतील.

Web Title: ambulance help riders support MGM hospital