औरंगाबाद शहर आठ दिवस वाऱ्यावर, आयुक्त सुटीवर, पदाधिकारी सहलीवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पुन्हा एकदा आठ दिवसांची सुटी टाकली आहे. शुक्रवारपासून (ता. 16) महापालिका-पदाधिकारी व नगरसेवकही सहलीवर जाणार असल्यामुळे शहराला वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

औरंगाबाद - शहरात साथीच्या रोगाने डोके वर काढले आहे. नळाला तब्बल आठ-दहा दिवस पाणी नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. स्मार्ट
सिटीची कामे रखडली असताना आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पुन्हा एकदा आठ दिवसांची सुटी टाकली आहे. शुक्रवारपासून (ता. 16) महापालिका-पदाधिकारी व नगरसेवकही सहलीवर जाणार असल्यामुळे शहराला वाली कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

महापालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. आयुक्त वारंवार सुटीवर जातात. शहरात असताना बहुतांशवेळा त्यांचा कारभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच चालतो. आयुक्त मुख्यालयात अधून-मधूनच येत असल्यामुळे व पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही. सकाळ-दुपार कार्यालयांमध्ये शुकशुकाट असतो. गेल्या आठवड्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलेल्या पाहणीत तब्बल 50 कर्मचारी लेटलतिफ आढळून आले होते. त्यांच्यावर कारवाईची शिफारस महापौरांनी केली होती; मात्र अद्याप आयुक्तांनी कारवाई केलेली नाही. त्यात पुन्हा एकदा आठवडाभराच्या सुटीवर ते गेले. महिन्यातला दुसरा शनिवार (ता. दहा) असल्याने सुटी होती. त्यामुळे शुक्रवारीच आयुक्तांनी औरंगाबाद शहर सोडले. त्यापूर्वी त्यांनी 18 ऑगस्टपर्यंत सुटी टाकली आहे. त्यात 15 व 17 ऑगस्टला दोन सुट्या आहेत. आयुक्त सुटीवर असतानाच महापालिका पदाधिकारीदेखील सहलीवर जाणार आहेत. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांना गुरुवारपासून (ता. 15) सहलीवर पाठविले जात आहे. महापौर शुक्रवारपासून (ता. 16) सहलीवर जातील. ते 19 ऑगस्टला परत येणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शहर वाऱ्यावर राहणार आहे. 
  
वारंवारच्या सुट्यांमुळे कारभार विस्कळित 
महापालिका आयुक्त वारंवार सुटीवर जातात. त्यात अभ्यास दौरा, खासगी कामांचा समावेश असतो. शहरात पाणी प्रश्‍न पेटलेला असताना त्यांनी लॉची परीक्षा देण्यासाठी दीर्घ सुटी घेतली होती. त्यांचा फोनदेखील डायव्हर्ट केलेला असतो. याबाबत नगरसेकांतर्फे आक्षेप घेतल्यानंतर सर्व अधिकार मी बहाल केले आहेत. त्यामुळे काम थांबण्याचे कारण नाही, असे उत्तर आयुक्तांतर्फे दिले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AMC commissioner On leave