महापौरांना स्वपक्षीय नगरसेवकांकडून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

औरंगाबाद - महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह झाला होता. बरीच काथ्याकुट केल्यानंतर भगवान घडामोडे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती; मात्र भाजपमधील अंतर्गत कलहाचा फटका पहिल्याच सर्वसाधारण सभेत महापौर घडामोडे यांना बसला. महापौरांना त्यांच्यात पक्षातील सदस्यांनी कात्रीत पकडले. 

औरंगाबाद - महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह झाला होता. बरीच काथ्याकुट केल्यानंतर भगवान घडामोडे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली होती; मात्र भाजपमधील अंतर्गत कलहाचा फटका पहिल्याच सर्वसाधारण सभेत महापौर घडामोडे यांना बसला. महापौरांना त्यांच्यात पक्षातील सदस्यांनी कात्रीत पकडले. 

आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना सभागृहात उभे राहून बोलायला सांगा, नाही तर त्यांनी सभागृहाचा हक्कभंग केल्याचे शासनाला कळवा, असे म्हणत महापौरपदाच्या स्पर्धेत राहिलेले राजू शिंदे यांनी भगवान घडामोडे यांच्यासमोर पेच निर्माण केला. पीठासन अधिकारी या नात्याने आपण आयुक्तांना खाली बसून बोलायचे आदेश देत आहोत, असे सांगून स्वत:ची अडचणीची वेळ आणि आयुक्तांचा होणारा संभाव्य अपमान दोन्हीतून महापौरांनी पर्यायी मार्ग काढला. यातून आयुक्तांशी संघर्ष न करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारल्याचे स्पष्ट होते. 

पहिल्याच सभेत अडचणीत आणण्याचा प्रयत्न 

महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलावलेली पहिली सर्वसाधारण सभा सुरू झाली तेव्हा कोरमअभावी सभा तहकूब करण्याची वेळ श्री. घडामोडे यांच्यावर आली. नंतर पुन्हा सभा सुरू झाल्यावर सर्व सदस्य "स्वच्छ महाराष्ट्र अभियान' या विषयावर चर्चा करू लागले. नंदकुमार घोडेले, ऍड. माधुरी अदवंत, सभागृहनेता गजानन मनगटे यांनी आपापली मते मांडल्यानंतर महापौरांच्या आदेशावरून आयुक्त सविस्तर माहिती देऊ लागले. अचानक माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी उभे राहून "सभागृहाचा मान राखला गेला पाहिजे, तसे होत नसेल तर महापौरांनी सभा तहकूब करावी' अशी मागणी केली. अचानक तहकुबीची मागणी आल्याचे पाहून नेमके काय चुकले हे सभागृहात कोणालाच कळेना. नेमकी काय अडचण आहे ते स्पष्ट करा? असे राजू वैद्य म्हणाल्यावर दिलीप थोरात यांनी "सभागृहात प्रत्येक सदस्याने उभे राहूनच बोलायचे असते, महापौरांनी सांगितले तरच बसून बोलायला हवे' असा खुलासा केला. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की, भाजप सदस्यांचा रोख बसून बोलत असलेल्या महापालिका आयुक्तांकडे आहे. या वेळी नगरसेवक अब्दुल रहिम शेख नाईकवाडी यांनी, आतापर्यंत नियम पाळले गेले नाहीत, आताच आग्रह का? असा प्रश्‍न उपस्थित केला. राज वानखेडे यांनी महापौरांनी आयुक्तांना राजशिष्टाचार शिकवावा, अशी मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महापौरांनी सभा तहकूब केली. 

नियम काय ते वाचून दाखवा 

पुन्हा सभा सुरू झाली तेव्हा या संदर्भातील नियम नगर सचिवांनी वाचून दाखवावा, अशी मागणी राजू शिंदे यांनी केली. सभापती वगळता प्रत्येक सदस्याने उभे राहून बोलावे, सभापतींनी आदेश दिल्यास बसून बोलावे, हा नियम नगरसचिव दिलीप सूर्यवंशी यांनी वाचून दाखवला. यानंतर आयुक्तांनी खुलासा केला की, आतापर्यंत जेवढ्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेत आपण बसूनच बोललेलो आहोत. शिंदे यांनी हा राजशिष्टाचाराचा प्रश्‍न आहे असे नमूद केले. ते म्हणाले, "मागे काय झाले तेच पाहत बसले तर नियमावलीला काहीच अर्थच राहणार नाही. सभागृहाचा हक्कभंग झाल्याचे महापौरांनी शासनाला कळवावे. त्यावर महापौरांनी स्पष्ट केले की, "पीठासन अधिकारी म्हणून मी आयुक्तांना आदेश देतो की त्यांनी बसूनच बोलावे.' त्यांच्या या निर्णयावर राजू शिंदे, प्रमोद राठोड, दिलीप थोरात, गोपाळ मलके नाराज होऊन सभागृहातून गुपचूपपणे निघून गेले. 

Web Title: amc corporator