विमा रक्कम पोचली एक हजार 142 कोटींवर 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न, "सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर मिळणार 12 लाख आठ हजार 306 जणांना लाभ. 
 

बीड - पीकविम्यापासून वंचित आणि अनेक दिवसांपासून खेटे मारून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाला "सकाळ'ने वाचा फोडली. त्यामुळे सुरवातीला 346 कोटी रुपये असलेला पीकविमा मंजुरीचा आकडा हळूहळू वाढत आता तब्बल एक हजार 142 कोटी रुपयांवर पोचला आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 12 लाख आठ हजार 306 शेतकऱ्यांना मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या विम्याचा लाभ मिळाला आहे. 

दुष्काळ बीड जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेला आहे. मागच्या वर्षी दुष्काळाने हाहाकार माजविला. खरिपावेळी पावसाने उघडीप दिली, तर परतीच्या पावसाने दडी मारल्याने रब्बीची पेरणीच झाली नाही. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटून मोठे नुकसान झाले. दरम्यान, निसर्गाच्या दुष्टचक्राने होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीकविमा योजना हाती घेतली आहे. मागच्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, बाजरी, मूग, कारळ अशा प्रमुख पिकांचे विमा संरक्षण केले. 14 लाख 11 हजार खात्यांचा पीकविमा उतरवत 2158 कोटी रुपयांचे विमा संरक्षण केले. मात्र, सुरवातीला कंपनीने केवळ 346 कोटी रुपये मंजूर केले. मात्र, "सकाळ'ने बातम्यांच्या माध्यमातून आसूड मारणे सुरूच ठेवल्यानंतर आता हा आकडा एक हजार 142 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. तब्बल 12 लाख आठ हजार 306 शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. 

"सकाळ'चे बातम्यांतून आसूड 
जूनमध्ये सुरवातीला कंपनीने केवळ कपाशी पिकालाच विमा मंजूर केला. 14 लाख 11 हजार शेतकऱ्यांनी विमा भरला होता; मात्र सुरवातीला 
सात लाख 42 हजार शेतकऱ्यांनाच 346 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यावर "पीकविमा योजना कंपनीच्या पथ्यावर' या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले. कंपनी शेतकऱ्यांच्या विम्यावर नफेखोरी करत असल्याचे समोर आणले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सोयाबीनसाठी 246 कोटी रुपये आणि कपाशीसाठी आणखी 54 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर "विम्यात घोळ कंपनीचा झोल?', "विम्यापासून वंचित ठेवण्याच्या डावाला कृषीचेही पाठबळ' व "पीकविमा : प्रशासन हलेना, कंपनी समाधान करेना' तसेच "चोरी करणाऱ्यांना संरक्षण, वंचितांवर दडपशाही' अशा मथळ्यांखाली वृत्त प्रसिद्ध करून कृषी कंपनीचे दुर्लक्ष, विमा कंपनीची नफेखोरी तर "सकाळ'ने उघड केलीच. शिवाय विम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांनाही वाचा फोडली. अखेर त्याला यश येत गेले आणि विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा बुधवारी सव्वाअकरा लाखांवर जाऊन विमा रक्कमही 880 कोटींवर पोचली होती. तरीही "सकाळ'ने शेतकऱ्यांच्या व्यथा लावूनच धरल्यानंतर हा आकडा एक हजार 136 कोटी रुपयांवर जाऊन पोचला आहे. आता पीकविमा मंजुरीचा आकडा एक हजार 142 कोटी रुपयांवर पोचून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 12 लाख आठ हजार 306 झाली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The amount of insurance reached Rs. 1,142 crore