पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

अनाळा - परंडा तालुक्‍यातील अनाळा येथे रविवारी (ता.१७) पाण्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

अनाळा - परंडा तालुक्‍यातील अनाळा येथे रविवारी (ता.१७) पाण्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

दसरा सणामुळे सध्या साफसफाई, कपडे धुण्याची लगबग सुरू आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने पूजा बाळू चोबे (वय १५) ही सकाळी सात वाजता कपडे धुण्यासाठी गावालगत असलेल्या ओढ्यावर गेली होती. या वेळी कपडे धुताना पाय घसरून ती पाण्यात पडली. दोन तासाहून अधिक वेळ झाला तरी पूजा घरी न परतल्याने आई तिचा शोध घेत ओढ्याकडे आली असता ती पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच पूजाचे वडील बाळू चोबे यांनी धाव घेत मुलीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पूजा दहावीत शिक्षण घेत होती.

दुसरी घटना तलाठी कार्यालयामागील परिसरात घडली. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची नवीन विहीर आहे. गुरे राखण्यासाठी गेलेले दत्ता संतराम काटे (वय ३६) हे पाय घसरून विहिरीत पडले. या वेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दीड तासानंतर गावातील युवकांनी गळाच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेतला. अथक परिश्रमानंतर दत्ता काटे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्याने अनाळा गावावर शोककळा पसरली आहे. आंबी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन मुळे करीत आहेत.

पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
इटकळ - पोहायला गेलेल्या आठवर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना केशेगाव (ता. तुळजापूर) येथे रविवारी (ता.१७) दुपारी एकच्या सुमारास घडली. जयभीम नितीन जावळे (वय ८, रा. केशेगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दुपारी पोहायला गेला असता विहिरीतील पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अंदाप्पा बागडे यांनी इटकळ पोलिस चौकीत दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: anala marathwada news two death in drown