आनंदनगर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी

तानाजी जाधवर
रविवार, 29 एप्रिल 2018

सकाळच्या पाठपुराव्याला यश
तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या महिलेला ताटकळत ठेवल्याची बाब सर्वप्रथम 'सकाळ'ने उघड केली होती. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत अशा अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या चौकशीत अधिकारी दोषी ठरल्याचे समोर आले. त्यामुळे 'सकाळ'ने दिलेल्या वृत्ताला चौकशीच्या अहवालातूनही दुजोरा मिळाला आहे.

उस्मानाबाद : शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेला पोलिस ठाण्यात ताटकळत बसविल्याप्रकरणी शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. बी. घात यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांवरही खात्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

शिक्षणाधिकारी जगताप यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी संबंधित महिला १० एप्रिल रोजी आनंदनगर पोलिस ठाण्यात आली होती. मात्र, या महिलेची तक्रार नोंदवून न घेता तिला ताटकळत बसवुन ठेवल्याच्या कारणावरुन पोलिस निरीक्षक घात यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. या महिलेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी दाद दिली नसल्याचे सांगितले होते. याची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षकांनी पोलिस उपअधीक्षकांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार त्याठिकाणी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार अशी चर्चा सुरु होती.

शुक्रवारी (ता. २७) हा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे आल्यानंतर त्यांनी अहवालात दिल्याप्रमाणे पोलिस निरीक्षक घात यांच्यावर ठपका ठेवत बदलीचे आदेश दिले आहेत. अन्य सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत देशमुख यांनी दिले आहेत.  

संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खात्यातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर विनयभंगाची 
तक्रार घेऊन पीडित महिला आल्यानंतर पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे.  त्यामुळे पोलिस निरीक्षक यांच्यावर बदलीची नामुष्की ओढावली आहे.  अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पोलिस अधीक्षक काय कारवाई करणार, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Anandnagar Police Station Police Inspector Transfer