esakal | अप-डाऊन करणारे कर्मचारी शहराबाहेरच
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

पोलिस, पालिका कर्मचारी, महसूल व आरोग्य विभाग वगळता इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. अप-डाऊन करणारे सर्व अधिकारी शहराबाहेर आहेत. मात्र अपडाऊन करणारे अधिकारी मात्र घरुनच कामकाज पाहत असल्याचे चित्र कळमनुरीत दिसून येत आहे.

अप-डाऊन करणारे कर्मचारी शहराबाहेरच

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली): कोरोना आजाराच्या परिस्थितीत शासकीय कार्यालयांमधून पाच टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कामकाज पाहण्याच्या शासनाच्या सुचनेकडे पोलिस, पालिका कर्मचारी, महसूल व आरोग्य विभाग वगळता इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. अप-डाऊन करणारे सर्व अधिकारी शहराबाहेर आहेत. शहरामध्ये वास्तव्याला असलेले इतर कर्मचारी कार्यालय उघडून हजेरी लावत असल्याचे चित्र बहुतांश शासकीय कार्यालयांमधून दिसून येत आहे.


कोरोना आजाराची पार्श्वभूमी पाहता केंद्र शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी शासनाने कामकाजावर मर्यादा टाकून सर्व सार्वजनिक कामे रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचाहिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आरोग्य, पोलिस, महसूल कर्मचाऱ्यांवर मदार

तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुद्धा गर्दी होणार नाही या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत पाच टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसआड कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिस्थितीत केवळ महसूल विभाग, आरोग्य, पोलिस, पालिकेचे स्वच्छता कर्मचारी व अधिकारी पूर्णवेळ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कर्तव्यावर आहेत. 

बहुतांश अधिकाऱ्यांचे अप-डाऊन

उर्वरित शासकीय कार्यालयांमधील बहुतांश अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली येथून अप-डाऊन करीत असल्यामुळे त्यांचा जनता कर्फ्यूपासून कळमनुरी व कार्यालयाचा संपर्क तुटलेला आहे. वास्तविक अधिकाऱ्यांनी आळीपाळीने कार्यालयात येऊन कार्यालयीन कामकाज करणे आवश्यक असताना घरी बसूनच हाताखालील कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत.

ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना

गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी वगळता पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा व शिक्षण विभागामधील आधिकारी मागील काही दिवसांपासून कर्तव्यावर हजर झाले नाहीत. या कार्यालयांतील सेवक व आस्थापना विभागातील कर्मचारी कार्यालयात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक ग्रामसेवकाला मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. 

येथे क्लिक कराकळमनुरीत ५० खाटांच्या कोरोना वार्डाची स्‍थापना

कारवाईकडे लागले लक्ष 

त्यामुळे पुढील काळात या परिस्थितीमध्ये गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. पोलिस, आरोग्य, महसूल व पालिका प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करित नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेचा ताण या विभागावर येऊन पडला आहे. दरम्यान, बाहेर गावाहून कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनीही मुख्यालयी राहत आपले योगदान द्यावे, अशी मागणी होत आहे.