लातूर : अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर आता ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव, ‘मती आणि भानामती’ या पुस्तकाचे लेखक माधव बावगे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी त्यांनी कळंब पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
अंनिसतर्फे सध्या ठिकठिकाणी वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण शिबिर घेतले जात आहे. या शिबीरातील व्याख्यानासाठी बावगे कळंब आणि वाशी भागात बुधवारी (ता. 26) गेले होते. त्यांच्या व्याख्यान संपल्यानंतर त्यांना एक दूरध्वनी आला. तु कोठे आहेस, पुण्यात आलास की तुझ्यावर गोळ्याच झाडतो, नाहीतर जिथे आहेस तिथे येऊन मारतो. तुम्हा ‘अंनिस’च्या लोकांना गोळ्या घालून खलासच केले पाहीजे, अशा शब्दांत धमकी देण्यात आली.
तुम्हाला हिंदच्याच अंधश्रद्धा दिसतात का, मुस्लिम लोकांच्या अंधश्रद्धा दिसत नाहीत का, स्मशाभूमी ही वाढदिवस साजरी करायची जागा आहे का...? असे वेगवेगळे प्रश्न विचारत समोरील व्यक्ती धमकावत होती, असे बावगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर ‘सकाळ’शी बोलताना बावगे म्हणाले, 'दूरध्वनी आलेल्या धमकीबाबत मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सुरक्षेची मागणी केली नाही. आता पुढच्या व्याख्यानासाठी कळंबमधून बाहेर पडलो आहे.'
दरम्यान, या घटनेचा ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि अंनिस लातूरचे अध्यक्ष वैजनाथ कोरे यांनी निषेध केला आहे. समाजपरिर्वतासाठी प्रयत्न करणाऱ्या, लोकांना प्रश्न विचारून लोकशाही व्यवस्था सदृढ करण्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जाणार असेल तर याची जबाबदारी सरकार, प्रशासनाने घ्यायला हवी, असे पाटील यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.