राजस्थान, पंजाब, पुणे, दिल्लीसह आंध्र विद्यापीठाची विजयी सलामी

file photo
file photo

परभणी : (कै.) सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धांना (पुरुष) मंगळवारी (ता. सात) येथे सुरवात झाली. स्पर्धेत राजस्थान, पंजाब, पुणे, दिल्लीसह आंध्र विद्यापीठाने विजयी सलामी दिली.
 
जिल्हा क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय सभागृहात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेचे उद्‍घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांच्या हस्ते कोर्टवर झाले. अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर, सचिव व स्पर्धा संयोजक विजय जामकर, उपाध्यक्ष  किरण सुभेदार, स्पर्धा नियंत्रक डॉ. विजय सोनावणे, किशोरसिंह व विजय कोकमठाणकर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. यू. डी. इंगळे, डॉ. महेश वाकरटकर, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव रवींद्र पतंगे, पांडुरंग कोकड, उन्मेश गाडेकर, नरेंद्र झांजरी आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत भोसले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता अवचार व डॉ. निर्मला जाधव यांनी केले, तर प्रा. डॉ. अभिजित सरनाईक यांनी आभार मानले. 


या स्पर्धेत देशाच्या चार विभागांचे १६ संघ सहभागी झाले असून त्यांची विभागणी चार गटांत करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ साखळी फेरीच्या सामन्यांसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या लढतीत जयपूर येथील राजस्थान विद्यापीठ, बेंगलोर येथील जैन विद्यापीठ, चंदिगड येथील पंजाब विद्यापीठ, विशाखापट्टनम येथील आंध्र विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ व रोहतक येथील एमडी विद्यापीठाने विजयी सलामी दिली.
 
पंजाब विद्यापीठाचा तीन विरुद्ध एका गुणाने पराभव
‘अ’ गटात राजस्थान विद्यापीठाने दरभंगा येथील एल. एन. मिथीला विद्यापीठ संघाचा तीन विरुद्ध शून्य गुणाने पराभव केला. एकेरीत हर्ष चापलोत याने शुभम कुमारचा २१-१४,२१-१० व अजय मीना याने आकाश ठाकूरचा २२-२०,२०-२२, २२-२० असा पराभव केला. दुहेरीत हर्ष व मनन जैन यांनी आकाश व शुभम यांचा २१-१६, २१-१३ असा एकतर्फी पराभव केला. याच गटात जैन विद्यापीठाने पतियाळा येथील पंजाब विद्यापीठाचा तीन विरुद्ध एका गुणाने पराभव केला. एकेरीत निखील श्याम श्रीराम याने हिमांशू तिवारीवर, तर रोहित याने शुभमवर मात केली. दुरेहीत मात्र पतियाळा विद्यापीठाने विजय खेचून आणला. कपिल चौधरी व शुभम यादव यांनी साई प्रतिक व सैफ अली यांच्यावर २४-२२, ११-२१ व २१-१० अशी मात केली. तिसरा एकेरीचा सामना जैन विद्यापीठाच्या डॅनियल याने नितेश यादवचा पराभव करून जिंकला. ‘ब’ गटात चंदिगड येथील पंजाब विद्यापीठाने कलकत्ता विद्यापीठाचा तीन विरुद्ध शून्य गुणाने, तर आंध्र विद्यापीठाने जोधपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठाचा तीन विरुद्ध शून्य गुणाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. 

 पुणे विद्यापीठाची दिब्रुगढ विद्यापीठावर मात
‘क’ गटात पुणे विद्यापीठाने आसाम येथील दिब्रुगढ विद्यापीठावर चुरशीच्या लढतीत तीन विरुद्ध दोन गुणांनी मात केली. एकेरीत पुण्याच्या ऋषिकेश होले याने अभिषेक दत्ता याचा व ऋषभ देशपांडे याने तारूत राजन दास याचा, तर दुहेरीत पुण्याच्या अदित्य म्हात्रे, अजिंक्य पाथरकर यांनी चिन्मय बोरा व सबर्थ गुप्ता यांचा पराभव करून विजय पटकावला. या गटात दिल्ली विद्यापीठाने कालीकत विद्यापीठाचा तीन विरुद्ध एका गुणाने पराभव केला. ‘ड’ गटाच्या चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठाने कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा तीन विरुद्ध दोन गुणाने, तर रोहतक येथील एमडी विद्यापीठाने जौनपूर येथील व्हीबीएसपी विद्यापीठाचा तीन विरुद्ध एक गुणाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com