अंगणवाडीतील बालकांना आता ‘आधार’वर आहार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - सर्वत्र आधार क्रमांकाचा वापर सुरू झाल्याने आता अंगणवाडीतील बालकांना आहार व औषधोपचारासाठीसुद्धा ‘आधार’ क्रमांकाचा वापर सुरू केला जाणार आहे. यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक बालकांची आधार नोंदणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. तीन महिन्यांत आधार नोंदणी पूर्ण होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

योजनांचा लाभ लाभार्थ्यांनाच मिळाला पाहिजे, योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा खऱ्याखुऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. महसूल विभागाने केलेल्या आधार नोंदणीच्या अहवालानुसार मार्च २०१६ पर्यंत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील एक लाख ६२ हजार २३१ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख दोन हजार ९०५ बालकांचे आधार कार्ड देण्यात आले आहेत. तर आधार नोंदणी झालेल्या मात्र त्यांच्या पालकांना अद्याप आधारकार्ड न मिळालेल्या बालकांची संख्या ५९ हजार ३२६ इतकी आहे. आता नव्याने वाढ झालेल्या बालकांसह आणखी जवळपास एक लाखाहून अधिक बालकांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तीन महिन्यांत या सर्व बालकांची नोंदणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी करण्यात येणाऱ्या आधार नोंदणीसाठी ६५ पर्यवेक्षिकांच्या परीक्षा घेण्यात आल्या असून, त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. उर्वरित ५० पर्यवेक्षिकांच्या परीक्षा सोमवार (ता. सहा) पर्यंत पूर्ण होतील. यानंतर प्रत्यक्ष आधार नोंदणीच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. अंगणवाडीतील बालकांना त्यांच्या आधार क्रमांकानुसारच आहार दिला जाईल; तसेच आधार क्रमांकामुळे त्यांच्यासाठी आवश्‍यक निधी, औषधोपचार व आहार देणे सोयिस्कर होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले.

Web Title: anganwadi child aadhar card nutrician food