सातशे गोठे जाणार कुठे?

माधव इतबारे
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबाद - स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील सुमारे ७०० गोठे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहेत. गोठ्यांमुळे पावसाळ्यात डासांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, महापालिकेमार्फत गेल्या दहा वर्षांपासून केवळ नोटिसांचा खेळ सुरू आहे. त्यात आता गोठ्यांसाठी आरक्षित असलेली २० एकर जागा कचरा प्रक्रिया केंद्रासाठी घेण्यात आल्याने गोठे जाणार कुठे? असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

औरंगपुरा, बेगमपुरा, गुलमंडी, मच्छलीखडक, हिमायतबाग परिसरासह विविध भागांत असलेले जनावरांचे सुमारे ७०० गोठे शहराबाहेर काढण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेचे कागदोपत्री प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शासनाने चिकलठाणा परिसरात २० एकर जमीनही दिली. या ठिकाणी गोठे हलविण्यासाठी प्रस्ताव तयार करून जनावरांच्या मालकांना नोटिसाही देण्यात आल्या; मात्र नेहमीप्रमाणे हा प्रस्तावही बारगळला. त्यात आता ही जागा कचरा प्रक्रिया केंद्रासाठी घेण्यात आल्याने गोठे जाणार कुठे असा प्रश्‍न अधिकारीच करीत आहेत. 

गोठ्यांपासून काय आहे धोका?
  जनावरांच्या मल-मुत्रामुळे डासांची वाढ होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मलेरियाचा धोका वाढतो. 
  जनावरांच्या उर्वरित चाऱ्यामुळे वाढतो कचरा.
  जनावरांचे मल-मूत्र ड्रेनेजमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे लाइन वारंवार चोकअप होतात. 
  शहरात दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार ७०० गोठ्यांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त जनावरे होती. 

गोठ्यांचा प्रश्‍न वॉर्ड अधिकारी स्तरावर हाताळला जातो. गोठ्यांमुळे डास उत्पत्ती वाढते हे खरे आहे. त्यानुसार गोठे हलविण्यासाठी किंवा तेथील स्वच्छतेसंदर्भात वॉर्ड अधिकाऱ्यांना पत्र देण्यात येईल. 
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका  

गोठे शहराबाहेर काढण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्यावेळी विरोध झाला. गोठ्यांसाठी आरक्षित असलेली जागा सध्या कचरा प्रक्रिया केंद्रासाठी वापरण्यात येत आहे. हा धोरणात्मक निर्णय असून, पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. 
-डॉ. बी. एस. नाईकवाडे, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका 

Web Title: animal shelter issue smart city