अण्णाभाऊंनी केले समाज जागृतीचे काम  

राजेश दारव्हेकर
रविवार, 26 जानेवारी 2020

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर चढलेली नसून ती शोषीत कामगारांच्या तळ हातावर तरली आहे, असा विज्ञानवादी दृष्टीकोण जोपासत अण्णाभाऊ साठे यांनी जनजागृतीचे काम केले आहे. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेवून आज आपण वाचन केले पाहिजे.

हिंगोली : ‘‘लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे केवळ दीड दिवस शाळेत गेले होते. तरी सुध्दा प्रचलित अपप्रवृत्तीच्या विरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. अनेक कादंबऱ्या, कथा, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटवला व समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा संघर्ष पाहता आपण यातून प्रेरणा घेवून लढायला शिकलो पाहिजे’’, असे मत प्रदीप साळुंके यांनी केले.

Image may contain: 1 person, on stage and indoor
प्रदीप साळुंके

क्रांतीविर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघातर्फे  महावीर भवन येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश पांडुरंग खिल्लारे, उद्‌घाटक उमरखेडचे आमदार नामदेवराव ससाने, तर प्रमुख पाहुणे डॉ. माधव मानवटे, गजानन शिंदे होते.  

हेही वाचा देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी : कुणावर व कशासाठी ते वाचा

श्री. साळुंके यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जिवन चरित्रातून काय शिकावे या विषयावर मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लिखानातून समाजाला जागृत करण्याचे काम केले.  समाजाचे वास्तव दु:ख त्यांनी आपल्या लेखनातून उतरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेवून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अण्णाभाऊ साठेंनी ३५ कादंबरी, तीन नाटकं, १३ कथा संग्रह, १० पोवाडे, लोकनाट्य, पटकथा, कथा, प्रवासवर्णन असे साहित्य निर्माण केले आहे.

Image may contain: 12 people, including Ramesh Raut, people sitting
व्याख्यानाला उपस्थित नागरिक

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर चढलेली नसून ती शोषीत कामगारांच्या तळ हातावर तरली आहे, असा विज्ञानवादी दृष्टीकोण जोपासत अण्णाभाऊ साठे यांनी जनजागृतीचे काम केले आहे. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेवून आज आपण वाचन केले पाहिजे. लिखान केले पाहिजे. स्वाभिमानाने जगण्यासाठी अण्णाभाऊंचे विचार अंगीकारुन अंधश्रध्दा दूर केली पाहिजे. बुवाबाजीला थारा न देता, महामानवाला जाती, धर्माच्या चौकटीत न बसविता त्यांचे विचार अंगीकारुन यशाचे शिखरे गाठा, असेही प्रदीप साळुंके यांनी आवाहन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Annabhau did the work of social awareness, Nanded News