शब्दांशी खेळ नको, सरसकट दुष्काळ जाहीर करा - शरद पवार

शब्दांशी खेळ नको, सरसकट दुष्काळ जाहीर करा - शरद पवार

औरंगाबाद - ""पावसाअभावी मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांतील स्थिती गंभीर आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी लहान मुलांसारखी विधाने करीत शब्दांशी न खेळता सरसकट दुष्काळ जाहीर करावा,'' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांचे या बाबतीतील ज्ञान मर्यादित आहे. त्यामुळे त्यांनी दुष्काळ हाताळणाऱ्या महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

बुलडाणा दौऱ्यावरून येथे आल्यानंतर पवार यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की मी,अनेक दुष्काळ बघितले. अहवाल, पैसेवारी यांचा विचार न करता आम्ही निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे पैसेवारी, अहवाल, केंद्र सरकारचे पथक बोलावण्याची गरज नाही. सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. माणसांसोबतच पशुधन जगले पाहिजे, यासाठी आपण राज्य, केंद्र सरकारची भेट घेणार आहोत. 

"सीबीआय'च्या गोंधळामागे राफेलम 
भाजपचे माजी मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांनी राफेल प्रकरणात तक्रार दिली होती. हे मला माहिती आहे. त्याचा आराखडादेखील मी वाचला होता. पुढे त्याचे काय झाले हे मला माहीत नाही, असे सांगत सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गोंधळामागे राफेलमधील भ्रष्टाचार हेच कारण असल्याचे सूतोवाच पवार यांनी केले. 

विकास गेला कुठे? 
भाजप सरकारच्या साडेचार वर्षांत विकास गेला कुठे, असा टोला लगावतानाच देशावर एकाच परिवाराने राज्य केले हे किती काळ सांगणार? आता तुम्ही काय केले, काय करणार, हे सांगा, असा सवाल पवार यांनी नाव न घेता मोदी यांना केला. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी केलेला त्याग दुर्लक्षित करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

काही जागांवर एकमत बाकी 
राज्यातील आघाडीच्या चर्चेत मी नसतो. मात्र कॉंग्रेसचा ज्या मतदारसंघात वारंवार पराभव झाला, त्या जागा आम्हाला द्यावात, अशी आमच्या वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, तर कॉंग्रेसचे केवळ दोनच उमेदवार विजयी झाले. त्यामुळे काही ठिकाणी अदलाबदल करू पाहत आहेत. केवळ सहा ते सात जागांवरून एकमत व्हायचे बाकी असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com