दुष्काळ तत्काळ जाहीर करा - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - ‘भर पावसाळ्यात अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके हातची गेली असून, होरपळणाऱ्या मराठवाड्यात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

औरंगाबाद - ‘भर पावसाळ्यात अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके हातची गेली असून, होरपळणाऱ्या मराठवाड्यात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी (ता. २६) श्री. पवार यांच्या उपस्थितीत सिडकोतील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात विभागीय बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा घेण्यात आला. यावेळी ते म्हणाले, ‘‘ या सरकारने कर्जमाफीची फक्त घोषणा केली. त्याचा अद्यापही अनेकांना लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे बॅंकांना लुटणारे सर्वच जण पळून जात आहेत. त्यामुळे डबघाईला आलेल्या बॅंकांचे चांगल्या बॅंकांसोबत विलीनीकरण केले जात आहे. लोकांना बदल हवाय, तो पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपात जनतेला द्या,’’ असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राजेश टोपे, भाऊसाहेब तरमळे, जयसिंग सोळुंके यांची भाषणे झाली. मंचावर आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार चंद्रकांत दानवे, कमाल फारुकी, सुरजितसिंग खुंगर, कदीर मौलाना, रवींद्र तौर, अनिल जाधव, उमर फारुकी, दत्ता भांगे, मयूर सोनवणे उपस्थित होते. 

तरुणांच्या मनात चीड
पंतप्रधानांनी १२५ कोटी जनतेला विकासाचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविली. भूलथापा मारून पंतप्रधानांनी देशातील ५५ कोटी तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तसेच सध्या तरुणांच्या मनात सरकारबद्दल चीड असल्याचेही नमूद केले.

‘बोफोर्सवर बोंबलणारे, राफेलवर गप्प का ?’
राजीव गांधी यांच्या काळात बोफोर्स तोफ गैरव्यवहारावर बोंबलणारे आता राफेलवर गप्प का आहेत? आघाडी सरकारच्या काळात या विमानाची किंमत ५२६ कोटी रुपये ठरली होती. मोदी सरकार आल्यानंतर ती १,६७० कोटी म्हणजे तीनपट कशी झाली, असा सवालही श्री. पवार यांनी यावेळी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announce the drought immediately Ajit Pawar