विवाह सोहळ्यातही अवतरला अँटी कोरोना पोलिस

केतन ढवण
Friday, 29 May 2020

एसपीने विवाह समारंभात सहभागी वधु वरांसह वऱ्हाडी मंडळींचा संसर्गापासून बचाव करत त्यांना सुरक्षिततेचा संदेश दिला. विवाह समारंभातील एसीपीची भूमिका सर्वांनाच भावली.

उजनी (जि.लातूर) : कोरोनाला घराबाहेर ठेऊन कुटुंबांतील सर्व सदस्यांची काळजी वाहणारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सुरू केलेला अँटी कोरोना पोलिसाचा उपक्रम आता घरातून सार्वजनिक कार्यक्रमात आला आहे. रविवारी (ता. २४) येथे झालेल्या छोटेखानी विवाह समारंभात अँटी कोरोना पोलिस (एसीपी) अवतरला. या एसपीने विवाह समारंभात सहभागी वधु वरांसह वऱ्हाडी मंडळींचा संसर्गापासून बचाव करत त्यांना सुरक्षिततेचा संदेश दिला. विवाह समारंभातील एसीपीची भूमिका सर्वांनाच भावली.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी कोरोनाचा घरामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून अँटी कोरोना पोलिस उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात घरातील लहान मुल किंवा जबाबदार व्यक्तीची एसीपी म्हणून नियुक्ती केली जाते. हा एसीपी घरातील सर्व सदस्यांची काळजी घेतो. घरातील व्यक्ती विनाकारण बाहेर जाणार नाही, गेला तरी जाताना त्याने तोंडाला मास्क बांधला बांधेल. बाहेरून घरी आल्यानंतर व्यक्तीकडून सॅनिटायजरने हात तसेच अन्य वस्तूचे निर्जंतुकीरण करून केले जाईल, याची काळजी एसीपी घेतो.

हेही वाचा - तरुणाईसाठी आदर्श : मराठवाड्यातील या भगिनींचे नोएडात कौतुक, कारण...

यासोबत घरातील ज्येष्ठ तसेच आजारी व्यक्तीचीही काळजी करेल. व्यक्तीने औषधी घेतल्या आहेत का, त्यांना काही त्रास आहे, याचीही तो काळजी करेल. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांत कोरोनाविषयी प्रभावी जागृती झाली. अनेक कुटुंबांतील एसीपीमुळे कोरोना त्यांच्या घराच्या बाहेरच थांबला. या उपक्रमाचे अनुकरण माजीमंत्री सुनिल तटकरे, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा कौतुक केले.

मात्र, राज्यभर गाजलेला हा उपक्रम घरापुरता मर्यादित न ठेवता येथील ढवण परिवाराने तो सार्वजनिक कार्यक्रमातही आणला आहे. येथील शिवाजी ढवण यांचा मुलगा संभाजी याचा विवाह आंदोरा (ता. औसा) येथील सुरेश मुळे यांची कन्या स्नेहल हिच्याशी रविवारी कोरोनाच्या सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य देऊन उत्साहात झाला. घरी झालेल्या या विवाह समारंभात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र अँटी कोरोना पोलीसाची नियुक्ती करण्यात आली होती.

हे देखील वाचलेच पाहिजे - मुदतीपूर्वीच उदगीरातील पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

सुरज ढवण यांनी ही जबाबदारी पार पाडत विवाह समारंभात सॅनिटायजरने सर्वांना निर्जंतुकरीणाची उपाययोजना सांगत ती करून घेतली. सहभागी वऱ्हाडींना मास्क बांधण्याचे बंधन घातले. बाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेऊन त्यांचेही वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले. विवाह समारंभ संपेपर्यंत त्यांचे काम सुरूच होते. कोणीही सुरक्षा उपायांचे उल्लंघन करणार नाही, याबाबत ते जागरूक राहिले. यामुळेच अॅंटी कोरोना पोलिसाच्या उपस्थितीत पार पडलेला येथील पहिला विवाह सोहळा सर्वांच्याच स्मरणात राहिला. उपस्थितांना हा उपक्रम खूपच भावला. त्यांनी ढवण परिवाराचे कौतुक केले आणि आपल्या कुटुंबांसोबत सार्वजनिक तसेच कौटुंबिक कार्यक्रमातही हा उपक्रम राबवण्याचा निर्धार केला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti Corona police also appeared at the wedding ceremony Latur News