फ्रान्सच्या विद्यापीठात रंगणार आपेगावकरांच्या पखवाजाची जुगलबंदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

बीड - फ्रान्समधील नांट विद्यापीठातील सभागृहात विविध युरोपियन वाद्यांबरोबरच भारतीय पारंपरिक वाद्य पखवाजाच्या जुगलबंदीची मेजवानी युरोपवासीयांना मिळणार आहे. समस्त भारत वर्षाला पखवाजाची मोहिनी घालणाऱ्या बीड जिल्ह्यातील आपेगाव (ता. अंबाजोगाई) येथील पंडित उद्धवबापू आपेगावकरांच्या बोटांची जादू सबंध युरोपभर अनुभवायास मिळणार असून २३ एप्रिलपासून ते युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. युरोपातील अनेक देशांमधील कलारसिकांना दिग्गज कलाकारांबरोबर बापू यांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे.  

बीड जिल्ह्यातील आपेगाव (ता. अंबाजोगाई) येथील पंडित उद्धवबापू आपेगावकर यांची पखवाज वादन कला सातासमुद्रापार लोकप्रिय झाली आहे. लंडन येथील सुप्रसिद्ध ग्रीन साऊथ हॉलमध्ये २३ एप्रिलला ‘वर्ल्ड स्ट्रिंग फेस्टिवल’मध्ये नेदरलॅंडचे पंडित अशोक पाठक यांच्यासोबत ‘सुरबहार’ या वाद्यासोबत ते साथसंगत करणार आहेत. युरोपातील वेस्टरॅन्ड येथे ‘दिलबाईक’ हा कार्यक्रम सादर करणार असून या कार्यक्रमात बेल्जियमचे सितारवादक बर्ट कार्नेलिस यांच्यासोबत जुगलबंदी रंगणार आहे. बापूंचा संगीतमय युरोप प्रवास हा ब्रुसेल्स, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, पॅरीस असा १६ मेपर्यंत चालणार आहे. 

उद्धवबापूंच्या या दौऱ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे ५ मे रोजी फ्रान्स येथील नांट विद्यापीठात ज्युलियन लेईबन यांचे व्हायोलिन, मॉरिच स्पींझ यांचे बास, बेमाड इपॉड यांचे युरोपियन गिटार आणि बापूच्या पखवाज जुगलबंदीचा करुणा इंडियन जाझ हा खास कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी फ्रान्समधील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या गायनाने अवघ्या जगाला मोहिनी घालणारे उस्ताद सईदुद्दीन डागर यांच्या ध्रुपद गायनाला ब्रुसेल्स या ठिकाणी बर्ट कार्नेलिस आणि बापू साथसंगत करणार आहेत. युरोपमधील विविध प्रतिष्ठित इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना पखवाज वाद्य शिकवणीची कार्यशाळा बापू घेतात. बीड जिल्ह्याचे सुपुत्र असलेले पंडित उद्धवबापू आपेगावकर यांनी महाराष्ट्रातील पखवाज हे वाद्य सातासमुद्रापार नेऊन महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यामुळे उद्धवबापूंवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: apegaonkar pakhwaj