'...अन्यथा 16 मेपासून छावण्या बंद करू'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

जाचक अटी रद्दसाठी चारा छावण्या चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

औरंगाबाद : चारा छावण्यांबाबत शासनाने 4 मे 2019 ला काढलेल्या निर्णयातील अटी आमंलात आणाव्या तरी कशा, या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. अन्यथा 16 मेपासून चारा छावण्या बंद करू असा इशारा चारा छावणी चालकांनी शुक्रवारी(ता.10) दिला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील चारा छावण्यांसदर्भात चालकांची शुक्रवारी (ता. 10) औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये छावणीतील जनावरांची दैनंदीन नोंदणी कॅटल कॅम्पस मॅनेजमेंट द्‌वारे करावी असे आदेशीत आहे. परंतू या आदेशातील अटी आमंलात आणने अशक्‍य असल्याने त्या त्वरीत शिथील कराव्यात, असे चारा छावणी चालकांचे म्हणणे आहे. नोंदणी पद्‌धतीने जनावरांची दैनंदिन नोंदणीही शक्‍य नाही. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क कमी असल्याने ते चालण्यास व स्कॅन करण्यास अडचणी येतात. शिवाय यामधील राशन कार्ड स्कॅन करून टाकण्याची अट अतिशय कठीण आहे. 70 टक्‍के शेतकऱ्यांकडे राशन कार्ड नाही. त्यामुळे राशन कार्डाची अट शिथील करावी. शिवाय जनावरांना दिले जाणारे अनुदान हे अत्यल्प असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. चारा छावण्यांसंदर्भात ज्या जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्या शिथील करण्यात याव्यात अन्यथा नाईलाजास्तव चालू व नवीन प्रस्तावित चारा छावण्या बंद करण्यात येतील असे चारा छावणीचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appeal to District Collector of Fodder Camp Owner