बीडचे नाव ऑक्स्फर्डच्या दस्तऐवजात, एसपी हर्ष पोद्दारांच्या कामाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

हर्ष पोद्दार यांनी २००९ मध्ये या विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी मिळविली. नंतर इंग्लडच्या नामांकित मॅजिक सर्कल लॉ कंपनीत बॅरिस्टर असलेले हर्ष पोद्दार भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. मालेगावचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करणारे पोद्दार यांची सव्वा वर्षांपूर्वी बीडला नेमणूक झाली.

बीड - जगातील टॉप आंतरराष्ट्रीय विद्यापीठात जिल्ह्यातले कोणी शिकले का अद्याप तरी ऐकिवात नाही. मात्र, बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार मात्र या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने त्यांच्या वार्षिक विशेषांकात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उत्तम कामाचे कौतुक केले. त्या निमित्ताने बीडचे नावही युनाटेड किंगडमच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या दस्तऐवजात नोंदले गेले. अनेक बाबींत नकारात्मक ओळख असलेल्या बीडमधील अनेक सकारात्मक बाबीही यामध्ये टिपल्या आहेत.

हर्ष पोद्दार यांनी २००९ मध्ये या विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी मिळविली. नंतर इंग्लडच्या नामांकित मॅजिक सर्कल लॉ कंपनीत बॅरिस्टर असलेले हर्ष पोद्दार भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. मालेगावचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करणारे पोद्दार यांची सव्वा वर्षांपूर्वी बीडला नेमणूक झाली. दरम्यान, विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी विविध देशांचे पंतप्रधानापासून उच्चपदांवर कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाची विद्यापीठ त्यांच्या वार्षिक विशेषांकात दखल घेते. तशीच दखल श्री. पोद्दार यांच्याबद्दलही घेतली. पोद्दार यांच्या कामगिरीमुळे बीडचे नावही या दस्तात नोंदले गेले. 

हेही वाचा -परजिल्ह्यात मुलीचे लग्न लावून बीड जिल्ह्यात आले

असा केला कार्याचा गौरव 
पोलिस अधीक्षक म्हणून पोद्दार यांनी १० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि ३० लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकवितानाच गुन्हेगारी रोखण्याबरोबरच वाहतूक उपाययोजनाही उत्तम केल्या. २०१९ च्या निवडणुका शांततेत आणि निष्पक्ष पार पाडण्यातही बीड पोलिस दलाचे काम महत्त्वाचे ठरले. पोद्दार यांनी पोलिसिंगसाठी नावीन्यपूर्ण रणनीती सुरू केली. ग्रामीण भागातील मतदारांमधील मतदानाबाबतची भीती दूर करण्यासाठी पोलिस त्यांच्या रक्षणाला खंबीर असल्याचा संदेश देणारा त्यांच्या प्रेरणेने तयार केलेल्या लघुपटाचाही उल्लेख या स्टोरीत करण्यात आला.

बीड हा देशातील सर्वांत राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा आहे. हर्ष पोद्दार यांनी तरुणांच्या विकृतीवरही मोठ्या प्रमाणात काम केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यांनी पोलिसांच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये गुन्हेगारीविरुद्ध जनजागृती केली. पोद्दार यांच्या मालेगाव येथील साहसी कारवाया आणि उपक्रमांचाही यात उल्लेख करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appreciate the work of SP Harsh Poddar