औरंगाबाद-शहादा बसला भीषण अपघात; ड्रायव्हरसह 14 ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

 दोंडाईचा - शहादा रस्त्यावर काल रात्री पावणेअकराच्या सुमारास बस व कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 14 जण जागीच ठार झाले. बसमधील ३० ते ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

निमगूळ -  दोंडाईचा - शहादा रस्त्यावर काल रात्री पावणेअकराच्या सुमारास बस व कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 14 जण जागीच ठार झाले. बसमधील ३० ते ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. थरकाप उडविणाऱ्या या अपघातानंतर पोलिसांसह निमगूळ, दोंडाईचा, सारंगखेडा, टाकरखेडा येथील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. 

धुळे शहरापासून ७० किलोमीटरावर, तर दोंडाईचापासून ८ किलोमीटरावर दोंडाईचा- शहादा मार्गावर वीज उपकेंद्राजवळ बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. औरंगाबाद- शहादा बस (एमएच २०, बीएल ३७५६) ही शहाद्याकडे जात होती. त्याचवेळी शहाद्याहून दोंडाईचाकडे कंटेनर (एपी २९- ७५७६) येत होता. या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोरा धडक झाली. कंटेनरने बसचा अर्धा भाग अक्षरशः चिरडून टाकला. त्यामुळे बस चक्काचूर झाली. शेवटचे दोन सीट दृष्टिपथास पडत होते. या भीषण अपघातात बसचालक मुकेश पाटील व कंटेनरचा चालक जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा व परिक्षेत्रातील पोलिस तसेच दोंडाईचा, निमगूळ, टाकरखेडा, सारंगखेडा येथील शेकडो तरुण आणि ग्रामस्थ मदतीसाठी धावले. बस आणि कंटेनर एकमेकांमध्ये अडकल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढणे जिकिरीचे ठरत होते. त्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांपासून वेगळी करण्यासाठी दोन क्रेनची मदत घ्यावी लागली. मदतकर्त्या ग्रामस्थांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. असे असताना रुग्णवाहिका व अन्य वाहने मदतीसाठी दाखल झाली. एकीकडे गंभीर जखमी प्रवाशांना बाहेर काढून विविध वाहनांनी शहादा व दोंडाईचाकडे उपचारासाठी पाठविले जात असताना घटनास्थळी अनेक जण मृत्यूमुखी पडल्याचे समोर आले. घटनास्थळावरचे दृश्‍य थरकाप उडवणारे होते. या अपघातामुळे दुतर्फा दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी घटनास्थळास्थळावर मृतदेह रुग्णवाहिकेने शहादा आणि दोंडाईचाकडे रवाना केले. घटनास्थळी प्रचंड गर्दी होती. पर्यटनमंत्री जयकुमार रावल मदतीसाठी घटनास्थळावर दाखल झाले. दोंडाईचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मदतीस सक्रिय होता. रात्रीचा अपघात आणि भीषणतेमुळे मृतांची ओळख पटू शकली नव्हती. तसेच जखमी प्रवाशांना उपचाराची गरज असल्याने त्यांचीही नावे निष्पन्न झालेली नव्हती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approximately fourteen people were killed Aurangabad-Shahada bus accident