एप्रिलच्या सुरवातीला उन्हापासून दिलासा 

अभिजित हिरप
गुरुवार, 30 मार्च 2017

औरंगाबाद - मराठवाडा, विदर्भात चैत्रातच वैशाख वणव्याची अनुभूती येत आहे. त्यामुळे आगामी काळातील उन्हाळा कसा असेल, याबाबत उत्सुकता आणि चिंताही आहे; मात्र ही तप्त उन्हाळ्याची चाहूल नसून भारताच्या आजूबाजूला ढगांच्या कोंडीमुळे उष्णतेची लाट आली आहे. ही कोंडी फुटण्यास सुरवात झाली असून एक एप्रिलपासून तीन अंशापर्यंत तापमानात घट होण्याचा अंदाज क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे काहीसा दिलासाच मिळण्याची शक्‍यता आहे. 

उष्णतेच्या लाटेने सर्वजण हैराण आहेत. सध्या तापमाना 41 अंशापुढे सरकलेले आहे. या प्रकारची लाट शक्‍यतो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर अनुभवायला येते. यंदा मार्चएंडलाच उष्णतेने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे यंदा सूर्याचा प्रकोप आणखी वाढतोय की काय, असा तर्क सर्वसामान्यांतून काढला जात आहे. मात्र, ही परिस्थिती एक एप्रिलपासून हळूहळू निवळायला सुरवात होईल, असा अंदाज "एमजीएम'च्या खगोल व अंतराळशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तविला आहे. 

"सकाळ'शी बोलताना श्री. औंधकर म्हणाले, की उत्तरेकडील पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिबेट, इंडोनेशिया आणि जावा-सुमात्रा बेटे आदी ठिकाणी थंड वाऱ्यासह पावसाचाही मारा सुरू आहे. त्याशिवाय पूर्व व पश्‍चिम हिंद महासागरावर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. चारही बाजूने ढगांनी वेढल्याने भारतात विशेषत: मध्य भारतात आर्द्रता कमी झाली. परिणामत: उष्ण वाऱ्याची लाट आली. त्यामुळे अचानक तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकले. नुकतेच कर्नाटकात रात्रीनंतर तापमानात घट होण्यास सुरवात झाली आहे. याचाच अर्थ चहूबाजूंची ढगांची कोंडी फुटण्यास सुरवात झालेली आहे. येत्या 48 तासांनी एक किंवा दोन एप्रिलला मराठवाडा व विदर्भात हलक्‍या व मध्यम पावसाची दाट शक्‍यता आहे. पावसानंतर कमाल व किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट निश्‍चित होईल. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हे ऊन उन्हाळी नसल्याने नेहमीप्रमाणे तापमानात वाढ होण्यास सुरवात होईल. 

पावसाची शक्‍यता 
मराठवाडा व विदर्भात दरवर्षी ऊन प्रचंड असते. मार्चच्या अखेरीस वाढलेल्या उन्हाने सर्वांनीच धसकाही घेतला; मात्र या उष्णतेच्या लाटेने घाबरून जाण्याचे कारण नाही. येत्या एक किंवा दोन एप्रिलला मराठवाडा, विदर्भात हलक्‍या व मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या पावसानंतर मागील आठ दिवसांत वाढलेली उष्णता आपोआपच कमी होईल, असेही श्री. औंधकर म्हणाले. 

Web Title: April's start relief from the heat