दोघींना वाचविले; पण दोन जीव गेल्याचे दुःख - एजाज

लक्ष्मीकांत मुळे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

अर्धापूर - 'एखाद्याचे प्राण वाचविण्याचे भाग्य लाभणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई असते. मीही नदीच्या पाण्यात चार महिला बुडताना पाहिले आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी मारली. दोन जीव वाचविले; पण दोन जीव गेल्याचे मोठे दुःख आहे. ती वेळच तशी होती, स्वतःच्या जिवापेक्षा दुसऱ्यांचे जीव वाचविणे महत्त्वाचे वाटले,'' अशी भावना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळालेल्या पार्डी (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील एजाज नदाफने आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

एजाज नदाफ हा यंदाचा महाराष्ट्रातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळालेला एकमेव मुलगा असून, तो पार्डीच्या राजाबाई माध्यमिक शाळेतील दहावीचा विद्यार्थी आहे. त्याच्यासह देशातील 18 बालकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी एजाज आपल्या वडिलांसोबत दिल्लीत गेला आहे. पुरस्कारांची सरकारकडून घोषणा झाल्यानंतर तालुक्‍यात आनंद व्यक्त करण्यात आला. एजाज नदाफच्या धाडसाचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित झाले होते. त्याला हा पुरस्कार मिळण्यासाठीही पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

पार्डी गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर 30 एप्रिलला या गावातील महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. काही महिला पाण्यात उतरल्या. पाणी जास्त असल्याने चार महिला बुडत असल्याचे लक्षात आले. बघ्यांची गर्दी वाढली; पण पाण्यात उतरून त्यांना वाचविण्याचे धाडस कोणीच केले नाही. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये तेथे उपस्थित असलेल्या एजाज नदाफने मागचापुढचा विचार न करता नदीत उडी घेतली आणि दोघींना वाचविण्यात त्याला यश आले; पण दोन महिला बुडाल्या. आज पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्याशी ही चर्चा केली असता त्याने बुडालेल्या दोघींना आपण वाचवू शकलो नाही, अशी खंतही व्यक्त केली.

Web Title: ardhapur marathwada news ejaj nadaf talking