एकलव्य बनत 'अर्जुन' झाला गाईड 

प्रकाश बनकर
मंगळवार, 1 जानेवारी 2019

जायकवाडीवर नानाविध पक्षी आहेत. येथे परदेशी पक्षीही मोठ्या संख्येने येतात. लहानपणापासून त्यांना पाहत आलोय. तेच माझे सर्वांत जवळचे मित्र आहेत. येथे येणाऱ्या पक्षीतज्ज्ञांमुळे त्यांची नावे, माहिती, महत्त्व कळत गेले. येथे येणाऱ्यांना मीही माहिती सांगतो. या बदल्यात ते जे देतील ते घेतो. मला वनविभागाचा गाईड म्हणून काम करण्याची इच्छा आहे; मात्र शिक्षणाची अडचण आहे. रोज धरणावर जाऊन पक्ष्यांना भेटल्याशिवाय करमत नाही. 
- अर्जुन कुचे 

औरंगाबाद : कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि आवड गरजेची आहे. त्याच जोरावर यशाला गवसणी घालता येते. असाच काहीसा प्रयत्न केलाय पैठण येथील अर्जुन कुचे याने. शाळेची पायरीही न चढलेला अर्जुन आज जायकवाडी जलाशयावर उडणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचे नाव, तो कुठून येतो, काय खातो, कसा दिसतो इथपर्यंतची खडान्‌खडा माहिती सांगतो. एवढेच नाही, तर जायकवाडीत पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या शिक्षितांसाठी अशिक्षित असलेला अर्जुन गाईड म्हणूनही काम करीत आहे. 

अर्जुनच्या कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय मासेमारी. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेता आले नाही. जायकवाडी जलाशयाच्या परिसरात तो गुरे राखण्याचे काम करतो. यातच त्याला पक्ष्यांची आवड निर्माण झाली आणि त्याने पक्षी निरीक्षण वाढविले. एकलव्य बनत पक्ष्यांचा अभ्यास केला. आज त्याला सर्वच पक्ष्यांची इत्थंभूत माहिती आहे. त्याच बळावर तो आता जायकवाडी जलाशयावर पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येकाला एखाद्या पक्षीतज्ज्ञाप्रमाणे पक्ष्यांविषयी माहिती सांगतो. शिवाय जर कुणी पक्ष्यांची शिकार करीत असेल तर त्याची माहितीसुद्धा थेट वनविभागाला देतो. 

बैजू पाटील यांनी दिली दुर्बीण 
अर्जुनची आवड पाहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार बैजू पाटील यांनी त्यास पक्षी निरीक्षणासाठी दुर्बीण भेट दिली. या दुर्बिणीच्या साह्याने तो आता सर्वांना मार्गदर्शन करीत आहे. यासह औरंगाबादेतील पक्षी प्रेमी मित्रांनी त्यास मोबाईल छायाचित्रांसाठीची दुर्बीण दिली आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता त्याने स्वतः काढलेली वेगवेगळ्या पक्ष्यांची छायाचित्रेही संग्रही आहेत. 

जायकवाडीवर नानाविध पक्षी आहेत. येथे परदेशी पक्षीही मोठ्या संख्येने येतात. लहानपणापासून त्यांना पाहत आलोय. तेच माझे सर्वांत जवळचे मित्र आहेत. येथे येणाऱ्या पक्षीतज्ज्ञांमुळे त्यांची नावे, माहिती, महत्त्व कळत गेले. येथे येणाऱ्यांना मीही माहिती सांगतो. या बदल्यात ते जे देतील ते घेतो. मला वनविभागाचा गाईड म्हणून काम करण्याची इच्छा आहे; मात्र शिक्षणाची अडचण आहे. रोज धरणावर जाऊन पक्ष्यांना भेटल्याशिवाय करमत नाही. 
- अर्जुन कुचे 

Web Title: Arjun Kuche success story