परभणीत सैन्य भरती :  २८ हजार उमेदवारांची मैदानी चाचणी 

 उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी कराताना.
उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी कराताना.

परभणी : नऊ जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सुरु असलेल्या सैन्य भरती मेळाव्यात ६८ हजार उमेदवारांनी अर्ज केला. त्यापैकी  २८ हजार ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाल्याची माहिती मेजर जनरल विजय पिंगळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडासंकुलाच्या मैदानावर ता.चारपासून सैन्य भरती मेळावा सुरु आहे. त्याची माहिती देण्यासाठी पुणे येथील लष्कर छावणीचे मेजर जनरल विजय पिंगळे आणि औरंगाबाद येथील सैन्य भरतीचे संचालक  कर्नल तरुण जमवाल यांनी गुरुवारी (ता.नऊ) पत्रकार परिषद घेतली. औरंगाबाद, बुलढाना, जालना, जळगाव, नंदुरबार, हिंगोली, परभणी, धुळे, नांदेड या नऊ जिल्ह्यांसाठी भरती सुरु आहे. हा मेळावा ता.१३ जानेवारीपर्यंत चालणार असून पारदर्शकपणे आणि भारतीय लष्कराच्या मापदंडाप्रमाणे मैदानी चाचणी घेतली जात असल्याचे श्री. पिंगळे यांनी सांगितले. ऑनलाइन पद्धतीने नऊ जिल्ह्यांतून तब्बल ६८ हजार अर्ज आले होते. त्यापैकी ३५ हजार उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यातील २८ हजार ५०० उमेदवारांची नऊ जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे.

मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जात असून त्यात जे उत्तीर्ण होत आहेत. अशा सर्वांची ता.२३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील लष्कराच्या केंद्रावर लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद लष्कर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यांसाठी दरवर्षी सैन्य भरती होणार आहे. त्यासाठी परभणी, जळगाव आणि औरंगाबाद हे केंद्र राहणार आहेत. प्रत्येक केंद्रावर दर तीन वर्षांनी भरती होणार आहे. मैदानी चाचणीत अपयश आलेल्या उमेदवारांनी खचून न जाता तयारी सुरु ठेवावी आणि जे मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरले आहेत, अशांसाठी लेखी परीक्षेची तयारी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करवून घेतली जाणार आहे. या वेळी कर्नल अनुराग, कर्नल राजीवकुमार, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस. एस. पाटील आदींची उपस्थिती होती.

    सैन्य भरती महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
दरवर्षी होणाऱ्या सैन्य भरतीमध्ये सर्वाधिक सैन्य हे उत्तरप्रदेश या राज्यातून निवडले जातात. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक आहे. त्यानंतर बिहार राज्याचा क्रमांक असल्याची माहिती मेजर पिंगळे यांनी दिली.

हेही वाचा -शिक्षणाच्या मूल्यसंवर्धनासाठी ‘हा’ प्रयोग..
भूलथापांना बळी पडू नका
सैन्य भरती ही अत्यंत पारदर्शकणे आणि मैदानी चाचणी द्वारे असल्याने बाहेरील कोणाच्याही भूलथापांना आणि दलालांच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन मेजर पिंगळे यांनी केले.

  भरतीसाठी रात्रीला प्राधान्य
सैन्य भरती दरम्यान, मैदानी चाचणीसाठी रात्री १२ ते पहाटे सात अशी वेळ निवडण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांना तारीख आणि वेळ आगोदरच दिला आहे. दिवसा वातावरणात बदल होतो, तर रात्रीच्या वेळी वातावरण स्थिर राहते. तसेच थंडीत कितीजण यशस्वी होतात ते पाहणे महत्त्वाचे असल्याने रात्रीची वेळ निवडण्यात आल्याचे कर्नल तरुण जमवाल यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना त्रास होणार हेदेखील कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com