वाटसरूंना मिळाला स्कूलबसचा आधार

बदनापूर : जालना - औरंगाबाद महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या वाटसरूंना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या स्कूलबस. 
बदनापूर : जालना - औरंगाबाद महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या वाटसरूंना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या स्कूलबस. 

बदनापूर (जि.जालना) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक मजूर - कामगार आपले मूळ गाव गाठण्यासाठी शेकडो किलोमीटर पायपीट करीत आहेत. अशा लोकांना आधार देण्यासाठी ‘ईसा’ संघटनेसह काही इंग्रजी शाळांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद - जालना जिल्ह्याच्या वरुडी शिवारातील चेकपोस्टवरून त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेवर स्कूलबसने मोफत सोडण्याची जबाबदारी काही इंग्रजी शाळांनी घेतली आहे. या बसगाड्या शुक्रवारपासून (ता. आठ) सुरू करण्यात आल्या आहेत. 

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी चर्चा करून परवानगी घेतली आहे. अर्थात यासाठी शासनाने दिलेले कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जाणार आहेत. प्रवासी आणि चालक यांचा संसर्ग टाळण्यासाठी चालकाच्या केबिनला सुरक्षितरीत्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे चालक आणि प्रवाशांचा प्रवासादरम्यान थेट संबंध येणार नाही. यातून एकमेकांना संसर्गाचा धोकाही कमी होणार आहे. या उपक्रमासाठी जालना येथील गुरुकुल ग्लोबल स्कूलच्या अध्यक्षा चंचल अमित आनंद आणि बदनापूरच्या आर. पी. इंग्लिश स्कूलचे संस्थापक भरत भांदरगे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. 

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कारखाने बंद पडल्याने कामगार - मजुरांच्या हाताला काम शिल्लक राहिलेले नाही. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडल्याने मजुरांना शेकडो मैल पायी चालत आपले मूळ गाव गाठण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आपले अवघे कुटुंब सोबत घेऊन स्थलांतरित मजूर व कामगार बाहेर पडले आहेत. मात्र अशा पद्धतीने पायी चालत जात असल्यामुळे त्यांच्या अन्नपाण्यासह निवाऱ्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. अशा लोकांना कुठे प्रशासन, कुठे सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती अन्नपाण्याची सोय करीत आहेत. तर कधी उपाशीपोटीदेखील भटकंती करावी लागत आहे. 

अशा लोकांना स्कूलबसमार्फत त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी ग्लोबल गुरुकुल, आर. पी. इंटरनॅशनल स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कोठारी इंटरनॅशनल स्कूल, ‘ईसा’ इंग्लिश स्कूल असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला आहे. यात परगावी पायी जाणाऱ्यांना जिल्हा ओलांडून त्यांच्या जिल्ह्यापर्यंत स्कूलबसने सोडण्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांची रीतसर परवानगीदेखील घेण्यात आली आहे. शिवाय बससह डिझेलचा खर्च, प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही स्कूलबस देणाऱ्या संस्थांनी घेतली आहे. मदतीच्या हातामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात पायी चालणाऱ्यांचे अंतरदेखील कमी होईल व संसर्ग वाढण्याची शक्यतादेखील कमी होईल. इतर शाळांनीदेखील त्यांच्या बसेस उपलब्ध करून देऊन मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोफत प्रवासाच्या स्कूलबस वरुडी चेकपोस्ट येथून सुटणार आहेत. प्रारंभी वरुडी चेकपोस्ट ते मंठा, वरुडी चेकपोस्ट ते सिंदखेडराजा, वरुडी चेकपोस्ट ते देऊळगाव राजा अशा फेऱ्या करणार आहेत. 

जालना जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजनबद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा फारसा संसर्ग होऊ शकला नाही. लॉकडाउनमुळे भटकंती करणारे रोजंदारी मजूर आणि कामगार आपल्या जिवावर उदार होऊन पायी प्रवास करीत आहेत. सध्या कडक ऊन पडत असल्यामुळे पायी चालत गाव गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी आम्ही इंग्रजी शाळाचालकांनी स्कूलबसने त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेवर पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. 
- भरत भांदरगे 
संस्थापक, आर. पी. इंग्लिश मिडियम स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com