कला क्षेत्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासूनच वाढीव गुण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना होणार लाभ; अकरावी प्रवेशातही राखीव जागा

यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना होणार लाभ; अकरावी प्रवेशातही राखीव जागा
लातूर - शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात व लोककला प्रकारात प्रावीण्य मिळवणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासूनच वाढीव गुण मिळणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून हे वाढीव गुण देण्याच्या निर्णयात राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी बदल केला असून, त्याचा फायदा यंदा दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना होईल. यासोबत अकरावी प्रवेशात कला क्षेत्रातील राखीव दोन टक्के जागांचाही लाभ या विद्यार्थ्यांना मिळेल.

कला व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अनुक्रमे दोन व तीन टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापुढे जाऊन सरकारने क्रीडा क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत सहभागी झालेल्या व नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याची बंद केलेली पद्धत दोन वर्षांपासून सुरू केली आहे. याच धर्तीवर शास्त्रीय कला व चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय सरकारने जानेवारीमध्ये घेतला. मात्र, हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करून, मार्च 2018 मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचे सरकारने निश्‍चित केले होते. त्यानुसार शास्त्रीय नृत्य, गायन व वादनात मान्यताप्राप्त संस्थांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास दहा, पाच परीक्षा उत्तीर्ण झाल्यास पंधरा तर तीनही प्रकारांत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पारितोषिक किंवा शिष्यवृत्ती मिळाल्यास पंचवीस वाढीव गुण मिळणार आहेत. प्रयोगात्मक लोककला प्रकारात पन्नास प्रयोग सादर केल्यास दहा तर पंचवीस प्रयोग केल्यास पाच तर सरकारच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पंधरा, दहा व पाच गुण अतिरिक्त देण्यात येणार आहेत. चित्रकला क्षेत्रात इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा, बी ग्रेडला दहा तर सी ग्रेड मिळवणाऱ्याला पाच वाढीव गुण मिळणार आहेत. यासोबत येत्या वर्षापासून अकरावी प्रवेशात कला क्षेत्रासाठी राखीव असलेल्या दोन टक्के जागांमध्ये शास्त्रीय गायन, नृत्य, वादन या कला प्रकारांत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही पात्र ठरवण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना दुहेरी लाभ
सरकारच्या यापूर्वीच्या निर्णयामुळे वाढीव गुणांचा लाभ पुढील शैक्षणिक वर्षात तर अकरावी प्रवेशाचा लाभ चालू शैक्षणिक वर्षात मिळणार होता. वाढीव गुण नसल्याने अनेक विद्यार्थी कमी गुणवत्तेमुळे चांगल्या महाविद्यालयात अकरावी प्रवेश घेऊ शकत नव्हते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत ओरड केल्यानंतर सरकारने 14 मार्चला निर्णयात सुधारणा करून दोन्ही निर्णयांचा लाभ चालू शैक्षणिक वर्षापासूनच देण्याचे जाहीर केले. यामुळे सध्या (मार्च 2017) दहावीची परीक्षा देत असलेल्या व कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण व अकरावी प्रवेशात राखीव जागा असा दुहेरी लाभ होणार आहे.

Web Title: art field ssc student marks increase