Article about indian golden era of ajintha
Article about indian golden era of ajintha

भारतीय सुवर्णयुगाचे दर्शन अजिंठा! 

बुऱ्हाणपूरकडून औरंगाबाद-दौलताबाद या दख्खनेत प्रवेशणाऱ्या मुख्य मार्गावरील अजिंठा-फर्दापूर सरायांपाशी ब्रिटिश घोडदळाचा मुक्काम होता. त्यातील एक लष्करी अधिकारी, जॉन स्मिथ, वाघोरा नदीच्या खोऱ्यात शिकारीला भटकत असताना, वाघाचा माग काढत विस्तीर्ण दरीच्या तोंडापाशी येऊन ठेपला. या निबिड दरीच्या तळाला वाघ दिसेनासा झाला; पण जॉन स्मिथला सापडल्या तब्बल बाराशे वर्षे गतकाळात हरवलेल्या प्राचीन अजिंठा लेणी! 

या लेणींच्या मधोमध असलेल्या भव्य मानवनिर्मित शैलगृहात शिरून, साचलेल्या गाळावर उभे राहून त्याने एका बुद्धचित्रावर नाव कोरले "John Smith 28th April 1819, 2nd/24th Cavalary", आणि विस्मृतीत गेलेला ऐतिहासिक वारसा, आधुनिक मानवी रसग्रहणासाठी, चिकित्सेसाठी उजेडात आला. सातव्या शतकातील चिनी प्रवासी, हुयांग त्संग (झुयांग झॅंग)चे वर्णन वगळता अनेक शतके या लेणींचे अस्तित्व अज्ञात होते. 

1843 साली इंग्लंडमध्ये जेम्स फर्ग्युसन यांनी अजिंठा लेणी व कलावशेषांची अभ्यासपूर्ण मांडणी करून त्याच्या अभ्यासासाठी अभ्यासकांना प्रवृत्त केले. त्यायोगे रॉबर्ट गिल हा मद्रास रेजिमेंटमधील अधिकारी लेणींच्या दस्तऐवजीकरणासाठी दाखल झाला. त्याने 1849 ते 1855 लेणींमध्ये मुक्काम ठोकून चित्रनमुने तयार करून इंग्लंडला पाठवले. दुर्दैवाने ती चित्रे आगीत भस्मसात झाली. अजिंठ्यातील बंगल्यात राहणाऱ्या रॉबर्ट गिल आणि पारो नावाच्या स्थानिक मुलीची विलक्षण प्रेमकथा प्रसिद्ध आहे. 

1872 ते 1885 या काळात जे. जे. आर्ट स्कूलचे मुख्याध्यापक, जॉन ग्रीफिथ यांनी अजिंठा लेणीतील चित्रांच्या प्रतिकृती करून घेतल्या; पण त्याही प्रदर्शनात आग लागून नष्ट झाल्या. अखेर, 20व्या शतकाच्या सुरुवातीला, हैदराबाद संस्थानकडून चित्रांच्या प्रतिकृतींचे काम झाले. त्याच काळात चित्रांच्या आणि लेणींच्या संवर्धनासाठी पावले उचलली गेली. नंदलाल बोस, समरेंद्र गुप्ता या कलकत्ता स्कूलच्या चित्रकारांनी लेणीतील चित्रांचा अभ्यास करून आधुनिक भारतीय कलापरंपरा पुनरुज्जीवित केली. अमृता शेरगिलसारख्या जगप्रसिद्ध चित्रकर्तीने अजिंठा चित्रशैलीवरून प्रभावित होऊन आधुनिक कलेचा वेगळा आविष्कार घडवला. चित्रकारच नव्हे, तर विविध काळातील इतिहासकार, कलाअभ्यासक, पुरातत्ववेत्ते, धर्मअभ्यासक, वास्तुविशारद आणि कलाकारांनाही अजिंठ्याने भुरळ घातली. 

वा. वि. मिराशी, शं. रा. गुप्ते, म. के. ढवळीकर, शोभना गोखले, ब्रह्मानंद देशपांडे, अ. प्र. जामखेडकर, रतन परिमू, दीपक कन्नल यांसारख्या दिग्गजांनी अजिंठ्याच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. वॉल्टर स्पिन्क, मोनिका झिन, डिअटर श्‍लींगनॉफ, रिचर्ड कोहेन या परदेशी अभ्यासकांनीही मोलाचे योगदान दिले. वॉल्टर स्पिन्क यांनी 1954पासून लेणींवर काम करत 7 खंडांचा बृहत्‌ग्रंथ लिहिला. 'दुसऱ्या टप्प्यातील लेणी अवघ्या 18 वर्षात खोदली गेली,' हे क्रांतिकारी मत त्यांनी सप्रमाण सादर केले. या मताचे खंडन करणारेही अनेक विद्वान आहेत. 

उण्याअधिक 30 शैलगृहांमध्ये दोन टप्प्यात इथे लेणी खोदल्या गेल्या. पहिल्या शतकातील सातवाहनकालीन समाजाच्या, जगातील सर्वात जुन्या चित्ररूप स्मृतींपैकी काही जातककथांच्या स्वरूपात लेणी क्रमांक 9-10मध्ये आढळतात. दुसऱ्या टप्प्याची निर्मिती 5व्या शतकात वाकाटक राजवंशात झाली. गुप्त राजवटीच्या समकालीन आणि विवाह संबंधांतील वाकाटक राजवट त्या काळातील भारतातीलच नव्हे; तर जगातील महासत्ता होती. देशोदेशी त्यांचा व्यापार होता. आजच्या औरंगाबाद परिसरातील "अश्‍मक' आणि अजिंठा येथील "ऋषिक' ही मांडलिक राज्ये त्यांच्या अधिपत्याखाली होती. ऋषिक राजा उपेंद्रगुप्त व वाकाटक सम्राट हरिषेण याचा पंतप्रधान वराहदेव यांनी दुसऱ्या टप्प्यातील लेणीनिर्मितीचा पाया रचला. 

अजिंठा लेणी येथील अभिजात चित्र व शिल्पांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सुवर्णयुग साकारले आहे. त्यातील नगरांचे भव्य देखावे, वैभव, संपूर्ण राजवाडे, बगीचे, अरण्यातील निसर्गदृश्य, देवता, पशु व सुबक मानवी चित्रीकरणातून तत्कालीन संस्कृती समाजाचे यथार्थ दर्शन घडते. ह्या सर्व विलासी दृश्यातून बौद्ध जीवनाचे आणि बौद्ध नीती तत्वज्ञानाचा विचार प्रभावी पणे पोहोचतो. अजिंठा चित्र, शिल्प, स्थापत्य आणि धार्मिक कला सौंदर्याचा अभूतपूर्व मिलाफ आहे. भारतीय सुवर्णयुगाचे खरे श्रेय गुप्तांचे नसून वाकटकांचे आहे.

गेल्या 200 वर्षात उजेडात आलेल्या अजिंठा लेणी समूहाचे सर्वांगीण आकलन होण्याची प्रक्रिया आजही सुरूच आहे. 5व्या शतकातील, कालिदासाच्या काव्यातील संस्कृती आणि प्रकृतीचे चित्रबद्ध स्वरूप आज इथल्या भिंतींवर मोहक स्वरूपात आणि तपशिलात आढळते. गुप्त राजघराण्याच्या समकालीन आणि नातेसंबंध असलेल्या बलशाली वाकाटक घराण्याची ही कलाकृती आहे. इथल्या खोदीव स्थापत्यशैलीचे व अभिजात मूर्तीशास्त्राचे पडसाद पुढील अनेक बांधीव व खोदीव वस्तू व वास्तू वाराश्यावर प्रभाव पडताना दिसतात.

1983 रोजी युनेस्को जागतिक वारसा अंकन झालेल्या ह्या लेणीसमूहाच्या संवर्धनाचे कार्य, विविध आव्हाने परतवून लावत भारतीय पुरातत्व खात्यामार्फत अव्याहतपणे सुरू आहे. भारताच्या गतकाळाचे रसरशीत प्रतिबिंब असलेल्या व मानवी कलाविष्काराचा मानबिंदू ठरलेल्या अजिंठा लेणी समूहाला सर्वांनी आयुष्यात एकदा तरी मनःपूर्वक भेट द्यावी व त्याचे रसग्रहण करावे. हा ठेवा संरक्षित राहावा व पुढच्या पिढ्यांसाठी  जोपासला जावा, ह्यासाठी आपण आजच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी निश्चय करूया!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com