हुतात्म्यांच्या जन्मस्थळावरील मातीपासून बनणार देशाचा नकाशा (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

  • औरंगाबादच्या कलावंताची 'जन्मभूमी ते कर्मभूमी' मोहीम 
  • 'इंडियन फर्स्ट'मधून आपणही करु शकतो हुतात्म्यांच्या कुटूंबियांना मदत

औरंगाबाद : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या चाळीस सैनिकांच्या जन्मभूमी आणि स्मृतिस्थळावरील माती घेऊन पुलवामा येथे 15 फुटांचा भारताचा नकाशा बनविण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद येथील कलावंत उमेश जाधव याने 'जन्मभूमी ते कर्मभूमी' ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत त्याने आतापर्यंत सहा राज्यांत जाऊन हुतात्मांचे जन्मस्थळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. शिवाय तो देशभर फिरणार असून, हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त व्हावा, देशभक्तीची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे उमेशने 'सकाळ'ला सांगितले. 

तो म्हणाला, "स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनीच सैनिकांची आठवण होते; मात्र त्यांची आठवण रोज व्हावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.'' उमेश मूळ औरंगाबादचा आहे. तो सध्या बंगळुरू येथे राहतो. नऊ एप्रिलला बंगळुरू येथील सीआरपीएफ (बीएलआर) डीआयजीपी, जीसी सनद कमल यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत मंडिया येथील हुतात्मा गुरू यांच्या स्मृती आणि जन्मस्थळाला भेट देत तेथील माती घेतली. देणगीतून जमा झालेल्या 50 हजार रुपयांची मदत त्याने हुतात्मा गुरू यांच्या कुटुंबीयांना केली. पुढे केरळ, तमिळनाडू आणि कनार्टक येथील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या मोहिमेत केरळ येथील अरुण आणि अनिश हे दोन युवकही जोडले गेले असल्याचे उमेशने सांगितले. 

​आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना जनमानसांत पोचविण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. आम्ही कलावंत जात-धर्म मानत नाही. यामुळेच निःस्वार्थपणे ही मोहीम राबवीत आहोत. यातून आम्ही प्रत्येक हुतात्म्याच्या जन्मभूमीची माती घेऊन त्यापासून देशाचा नकाशा करणार आहोत. यासाठी प्रत्येक राज्यात जात आहोत. आता बुलडाण्याकडे जाणार जाणार आहे. 
- उमेश जाधव 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artist umesh jadhav take an initiative of fund raising for Martyrs family