
एक रुपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कलात्मक रंगीत व्यक्तीचित्र
औरंगाबाद - १.५ त्रिज्या असलेल्या एक रुपयाच्या नाण्यावर अवघ्या ३५ मिनिटे आणि १५ सेकंदात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तीचित्र रेखाटून कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी जगातील पहिलाच प्रयोग केला आहे. त्यांच्या या प्रयोगाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. औरंगाबाद शहरातील कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूल येथे राजेश निबांळकर हे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांनी कलात्मक अभिवादन केले. १.५ त्रिज्या असलेल्या एक रूपयाच्या नाण्यावर ३५.१५ सेंकदात त्यांनी हे व्यक्तिचित्र रंगवून पूर्ण केले.
निंबेकर यांनी साकारालेला जगातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या वेळेस खूप जास्त मर्गदर्शक ठरले. वर्तमानात आणि भविष्यात देखील अर्थकारणात ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ मधील मूल्य हे मार्गदर्शक ठरत आहेत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक रूपयाच्या नाण्यावर आंबेडकरांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना आगळ्या- वेगळ्या कलात्मक पद्धतीने अभिवादन केल्याचे निंबेकर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगीतले.
राजेश निंबेकर यांनी यापूर्वी देखील पिंपळाच्या पानावर गौतम बुद्ध यांची रांगोळी साकारुन विश्वविक्रम केला होता. त्याची देखील ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या प्रयोगामुळे निंबेकर यांच्या नावावर दोन विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी अनेक कलांच्या माध्यमातून फलक लेखन, रांगोळी चित्र, पोट्रेट, नाट्य, नृत्य, काव्यलेखन, गायनाच्या माध्यमातून महामानवांचे विचार समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
Web Title: Artistic Colorful Portrait Of Dr Babasaheb Ambedkar One Rupee Coin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..