नरसीत भाविकांविना आषाढी, संत नामदेव महाराजांच्या समाधीची महापूजा

Sant Namdev Narsi Hingoli
Sant Namdev Narsi Hingoli

हिंगोली : प्रतिपंढरपूर, संत नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी दरवर्षी पर्वणी असते. कोरोनामुळे यंदा मात्र शुकशुकाट होता. भाविकांविना मंदिरात केवळ धार्मिक कार्यक्रम झाले. संत नामदेव महाराजांच्या समाधीची मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे पाचला महापूजा झाली. अभिषेक करण्यात आला. सुरक्षित अंतर पाळत माधवराव पवार, मगर महाराज, विलास कानडे, शाहूराव देशमुख, डॉ. सतीश शिंदे, गिरी महाराज आदी उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनसाठी बंद करण्यात आले.


आषाढी एकादशीला पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाची लाखो भाविक वारी करतात. पंढरपूरला जाऊ न शकलेले पंचक्रोशीतील हजारो भाविक संत नामदेवांच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. त्यामुळे नरसी येथे प्रतिपंढरी अवतरल्याचे चित्र दिसून येते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट होता. येथील पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सदानंद येरेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


भाविकाविनाच पार पडली यात्रा
औंढा नागनाथ : येथील गोकर्णेश्वर माळरानावर आषाढी एकादशीनिमित्त भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केल्याने भाविकांनी मंदिराकडे जाऊ नये यासाठी पोलिसांनी जागोजागी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान यावर्षी भाविकांविना मंदिर परिसर व घाटाचे रस्ते सुनेसुने दिसत होते. दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरातही सकाळी सहा वाजता संस्थेचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या हस्ते महापूजा पार पडली. या वर्षी करोनामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये म्हणून प्रशासनाने अगोदरच जनजागृती केली होती. हे ठिकाण वन विभागाचा वन पर्यटन हद्दीत आहे. येथील गोकर्णश्वराचे दर्शन घेतल्याने साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन होते, अशी भावना असल्याने दरवर्षी येथे परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

त्यामुळे येथे मोठी यात्रा भरते. घाटाचे रस्ते भाविक सहज पार करत जातात व सोबत आणलेले फराळ खाऊन वनभोजनाचा आनंद घेतात, परंतु या वर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून यात्राच रद्द केली. त्यामुळे ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसत होता. दरम्यान तहसीलदार पांडुरंग माचेवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी मंदिर परिसर पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, संदीप थडवे, बालाजी जाधव, सचिन शिंदे, गणेश लेकुळे, सुभाष काळे, वनिता राठोड, जमादार आफसर पठाण, सुखदेव जाधव, वन विभागाचे अमोल झिनकरवाड, बी.एफ.जाधव, एस.एल.गायकवाड आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com