'त्यांची' वैचारिक पातळी सरदार पटेल यांच्याएवढी कधीच होऊ शकणार नाही- अशोक चव्हाण 

Ashok_Chavan
Ashok_Chavan

औरंगाबाद - फसलेली कर्जमाफी, गुन्हेदारीचे वाढते प्रमाण, जलयुक्‍त शिवारमध्ये झालेला भष्ट्राचार, गरजू शेतकऱ्यांना वाटप न झालेले पिककर्ज अशा अनेक पातळ्यावर हे सरकार अपयशी ठरले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्‍नांना कशी उत्तरे द्यायची, या भितीपोटीच मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाचा कालावधी घटविला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केला. 
काँग्रेसतर्फे मराठवाड्यात काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचा गुरुवारी (ता.एक) येथे समारोप झाला. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चार वर्षातील कारभारावर आसुड ओढले. ते म्हणाले, कर्जमाफी केवळ अर्ध्या शेतकऱ्यांनाच मिळाली आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बॅंक, सावकार बायकांची मागणी करीत आहेत. गुन्हेगारी तर खुद्द मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. आपल्या देशात महान राष्ट्र पुरूषांचे पुतळे, स्मारक उभारण्याची आपल्याकडे परंपराच आहे. सरदार पटेलाचा जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये उभारण्यात आला, त्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, ज्यांच्या हस्ते या पुतळ्याचे उदघाटन झाले, त्यांची वैचारिक पातळी मात्र सरदार पटेल यांच्याएवढी कधीच होऊ शकणार नाही, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला. 

सरसकट दुष्काळ जाहीर करण्याऐवजी मध्यम व गंभीर स्वरुपाचा शब्दप्रयोग हा सरकारने लावलेला जावाई शोध आहे. राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश्‍य आणि पालकमंत्री असदृश्‍य अशी अवस्था आहे. यावेळी राज्याचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, सचिन सावंत, राजु वाघमारे, आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे उपस्थित होते. 

औरंगाबाद लोकसभा काँग्रेसच लढविणार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबाद लोकसभेची जागा लढवण्यास आम्ही इच्छूक असल्याचे संकेत देत हा मतदारसंघ आम्हाला सोडावा, अशी मागणी होत असल्याचे जाहीर केले होते. याबाबत विचारले असता, औरंगाबादची जागा काँग्रेसची आहे आणि आम्हीच ती लढवणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने फेक 
या सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांना गाजर दाखविण्याचे काम केले. हमीभाव, दाल नियंत्रण कायद्याची घोषणा अजूनही प्रत्यक्षात उतरली नाही. केवळ आश्‍वासने द्यायची आणि नंतर विसरून जायचे, हीच या सरकारची कामगीरी आहे. फेकाफेकीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दांवर आता जनतेचा विश्‍वास राहीला नसल्याची टिका श्री. चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com