दक्षिण-मध्य रेल्वेचा मराठवाड्यावर अन्याय : अशाेक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

यावर्षी उन्हाळी सुट्ट्यात दक्षिण-मध्य रेल्वेने ४५ गाड्यापैकी फक्त दाेन गाड्या नांदेड विभागाला दिल्या. महसूल देणारा हा विभाग तिसऱ्या क्रमांकाचा आहे. तरीही असा अन्याय केला जाताे. मराठवाड्याच्या जनतेवर व प्रवाशावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही

नांदेड, ता. १२  : दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागाला नेहमीच सापत्न वागणूक देते. एवढेच नाही तर विशेष गाड्याही या विभागाला जास्त दिल्या जात नाहीत. गाड्यांचे वेळापत्रक खासगी (ट्रॅव्हल्स) प्रवासी वाहतुक चालकांच्या मर्जीने तयार करण्यात येत असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी आज (ता. १२) केला.

या वेळी महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक निरूत्तर झाले. मराठवाड्यासाठी काही तरी ठोस निर्णय घ्या? असा सवालही तिन्ही खासदारांनी केला.

दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी नांदेड विभागांतर्गत असलेल्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण, हिंगोलीचे खासदार राजीव सातव आणि परभणीचे खासदार संजय जाधव उपस्थित होते. या महत्वाच्या बैठकीला आठ खासदारांनी दांडी मारली.

खासदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना व महाव्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले. नांदेड - नागपूर ही गाडी दररोज चालवावी, नांदेड- पनवेल गाडीला अधिक डबे जोडावेत, नांदेड - मुंबई अतिजलद गाडी चालवावी, उमरी, धर्माबाद हा भाग नांदेड विभागाला जोडावा आणि लांब पल्ल्याच्या दर दोन गाड्यांना उमरी, धर्माबाद येथे थांबा द्यावा अशा मागण्या चव्हाण यांनी बैठकीत केल्या. काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक चुकीच्या पद्धतीने केले असून त्याची आम्ही सर्व खासदार संसदेत सीबीआयकडून चौकशीची मागणी करणार आहाेत. मराठवाड्याला पाहिजे त्या महत्वाच्या गाड्या दिल्या जात नाहीत. नेहमीच मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. यावर्षी उन्हाळी सुट्ट्यात दक्षिण-मध्य रेल्वेने ४५ गाड्यापैकी फक्त दाेन गाड्या नांदेड विभागाला दिल्या. महसूल देणारा हा विभाग तिसऱ्या क्रमांकाचा आहे. तरीही असा अन्याय केला जाताे. मराठवाड्याच्या जनतेवर व प्रवाशावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

त्यानंतर यादव यांनी नांदेड-पनवेल गाडीला डबे वाढवून देऊन आणि वेळापत्रकाचे पुनर्निक्षण करण्याचे आश्‍वासन दिले. सातव यांनीही नांदेड- नागपूर ही गाडी नियमित सुरू करावी, अकोला - मुंबई सुपरफास्ट गाडी चालवावी, पनवेल गाडीची वेळ बदलून ती कमीत कमी वेळेत पोचली पाहिजे असे वेळापत्रक तयार करावे आदी मागण्या केल्या. नंदिग्राम, देवगिरी या गाड्यांना अधिक डबे जोडावेत, स्वच्छ व चांगल्या दर्जाची सेवा देण्यात यावी, मध्य रेल्वे व दक्षिण-मध्य रेल्वेमध्ये समन्वय असावा, त्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

खासदार जाधव म्हणाले, की पूर्णा येथे डिझेल लोको शेड उभारावे. नांदेड - पनवेल गाडीला गंगाखेड येथे थांबा देण्यात यावा यासह परभणी जिल्ह्यातील रेल्वे समस्यांचे निराकरण करावे, दुहेरीमार्गाचे काम लवकर करून प्रवाशांची सोय होईल याची काळजी घ्यावी. हा विभाग मध्य रेल्वेला जोडावा ही मागणी अनेक वर्षांपासूनची असून ती निकाली काढावी. यादव यांनी विद्युतीकरण होत असल्याने पूर्णा येथे आता लोकोशेडची गरज नाही असे सांगून अन्य मागण्या आम्ही रेल्वे बोर्डाकडे पाठवून देऊ असा विश्‍वास दिला.

Web Title: Ashok Chavan warns Southern railway against biased treatment for Nanded