
ऐन सणासुदीत १६ गावांतील नागरिक धान्यापासून वंचित
आष्टी : पुरवठा विभाग व वितरण व्यवस्थेच्या तांत्रिक अडचणींमुळे तालुक्यातील ऑगस्ट महिन्याचे धान्य अद्याप प्राप्त झाले नसल्याने १६ गावांतील नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात कडा व आष्टी येथे शासकीय गोदामे असून या दोन्ही गोदामांपैकी कडा येथील गोदामातून १०७ गावे व आष्टी येथील गोदामातून ८७ गावांमध्ये शासकीय धान्याचा द्वारपोच पुरवठा करण्यात येतो. शासकीय नियमाप्रमाणे महिनाअखेरपर्यंत शिधापत्रिकाधारकांना मोफत व नियमित असे दोन्ही धान्य प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र, तालुक्यातील कडा, शेडाळा, पिंपरी घुमरी, कानडी बुद्रुक, पिंपरखेड, हिवरा, कडा, साकत, कारखेल, लमाणतांडा कारखेल, सांगवी पाटण, नांदा, म्हसोबाचीवाडी, अंभोरा, मोरेवाडी (प्रत्येकी एक दुकानदार), देवीनिमगाव व लोणी (प्रत्येकी दोन दुकानदार) अशा एकूण १६ गावांतील १८ स्वस्त धान्य दुकानदारांना ऑगस्ट महिन्याचे धान्य कडा येथील शासकीय गोदामांतून प्राप्त झाले नाही.
पुरवठा विभाग व वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी व त्रुटींमुळे हे धान्य स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचले नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सर्वसामान्य शिधापत्रिकाधारक लाभार्थींना ऐन गौरी-गणपतीच्या सणासुदीच्या काळात हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागले आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लाभार्थींमधून होत आहे.
भारतीय अन्न महामंडळाकडून ऑगस्ट महिन्याच्या धान्याची वेळेत आवक न झाल्याने तालुक्यातील १८ दुकानदारांना धान्याचे वाटप करण्यात आले नाही, असे गोदामरक्षकाने कळविले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत धान्य प्राप्त होणार असून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरणास मुदतवाढ देऊन हे धान्य लाभार्थींना वितरित केले जाणार आहे.
-बाळदत्त मोरे, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, आष्टी