भाविकाविना साजरी होतेय तूळजापुरात मानाची अश्विनी यात्रा!  

जगदीश कुलकर्णी
Saturday, 31 October 2020

कोरोनाचा परिणाम : तुळजापूरकडे येणारे रस्ते पहिल्यांदाच ओस 

तुळजापूर :  तुळजा भवानीमातेची शनिवारी (ता. ३१) अश्विनी पौर्णिमा यात्रा आहे. पण, यंदा कोरोनामुळे या उत्सवावर निर्बंध असल्याने शहराबाहेरील सर्व रस्ते ओस पडले आहेत. दरम्यान, तरीही काही भाविक शहरात येत आहेत. पण, दरवर्षीच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच नगण्य आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
तुळजा भवानी मंदिरात शनिवारी अश्विनी पौर्णिमेनिमित्त धार्मिक विधी परंपरेने पार पडणार आहेत. तुळजाभवानी मंदिरात यंदा अश्विनी पौर्णिमेस भाविकांविना अश्विनी यात्रा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांनी यात्रेच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून आतापर्यंत अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. पोलिस उपविभागात तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर, तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यांवर अनेक ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. शहरात जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. रोशन यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी शुक्रवारी भेटी दिल्या. शहरात पोलिस प्रशासनाने वाहने येऊ नयेत यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत. शहरात येणाऱ्या नागरिकांना आधारकार्ड पाहूनच प्रवेश देण्यात येत आहे. नळदुर्ग रस्त्यावर भाविकांनी लांबूनच दर्शन घ्यावे, यासाठी काही ठिकाणी देवीचे छायाचित्रे लावण्यात येणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
विविध धार्मिक कार्यक्रम 
तुळजा भवानी मंदिरात शनिवारी पहाटे तुळजा भवानी मातेची निद्रिस्त मूर्ती सिंहासनावर अधिष्ठित करण्यात येईल. त्यानंतर देवीचा अभिषेक होणार आहे. त्यानंतर अंगारा मिरवणूक होईल. तुळजा भवानी मातेचा पलंग पारंपरिक पलंगाच्या खोलीत ठेवण्यात येईल. यासंदर्भात येथील पलंगाचे मानकरी गणेश पलंगे यांनी सांगितले की, शनिवारी पहाटे मागील वर्षीचा जुना पलंग तुळजा भवानी मातेच्या होमकुंडात अर्पण करण्यात येईल. त्यानंतर तुळजा भवानी मातेस पलंगी पौर्णिमेचा नैवेद्य परंपरेने होणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

करणार अॅंटीजेन टेस्ट 
तुळजा भवानी मंदिरात शनिवारी होणाऱ्या अश्विनी पौर्णिमेनिमित्त काठ्याचे मानकरी मंदिरात जाणार आहेत. त्यांची अॅंटीजेन टेस्ट दिवसभर मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात करण्यात आल्या. 

२५ एसटी बसची व्यवस्था 
तुळजा भवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त भाविक शहरात येणार नाहीत. तथापि, राज्य परिवहन महामंडळाने आवश्यकता भासल्यास २५ एसटी आगारात ठेवलेल्या आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwini Yatra without devotees celebrate Tuljapur news