शेती नुकसानीच्या पंचनाम्यासाठी यांची घेणार मदत

अभय कुळकजाईकर
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नांदेड : पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही मोठ्या स्‍वरूपाची अाहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या स्‍वयंसेवी संस्था, संघटना, युवक यांनी सहकार्य करावे. झालेल्‍या नुकसानीचे जिओ टॅग फोटो, पंचनामा करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना माहिती उपलब्‍ध करून देण्‍याबाबत मदत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 

नांदेड : पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही मोठ्या स्‍वरूपाची अाहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या स्‍वयंसेवी संस्था, संघटना, युवक यांनी सहकार्य करावे. झालेल्‍या नुकसानीचे जिओ टॅग फोटो, पंचनामा करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांना माहिती उपलब्‍ध करून देण्‍याबाबत मदत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 

जिल्ह्यात पिकांच्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे काम अंतिम टप्‍प्यात आले असून, सद्यःस्थितीत ७८.४८ टक्के पंचनामे करण्‍याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकरणी पीक नुकसानीचे सर्व पंचनामे प्रत्‍यक्ष जायमोक्‍याच्‍या ठिकाणी जाऊन शुक्रवारपर्यंत (ता. आठ) पूर्ण करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शासकीय यंत्रणांना दिले आहेत.

विवरणपत्रातील माहिती तत्‍काळ सादर करण्‍याचे निर्देश

दरम्यान, ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्‍या नुकसानीबाबत जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवारी (ता. सात) जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्‍हा उपनिबंधकांसह एआयसी विमा कंपनींच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी ऑक्‍टोबरमधील पावसामुळे शेतपिकांचे ३३ टक्के किंवा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीबाबत शासनास सादर करावयाच्‍या विवरणपत्राची माहिती दिली. या विवरणपत्रातील माहिती तत्‍काळ सादर करण्‍याचे निर्देश दिले.

शासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य

ऑक्‍टोबरमधील शेतपिकांसाठी ज्‍या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे, अशा शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्‍यासाठी संबंधित कंपनीच्‍या प्रतिनिधीसह संयुक्‍त समितीने सर्वेक्षण करणे आवश्‍यक आहे. तथापी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामा करते वेळी उपस्थित नसल्यास शासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्‍यात येतील, असे कृषी आयुक्‍त (पुणे) यांनी कळविले आहे.

पंचनामा आवश्‍यक

ऑक्टोबरमधील झालेल्या नुकसानीच्‍या पंचनाम्‍या दरम्यान काढलेले फोटो पिकांच्‍या नुकसानीचा पुरावा म्‍हणून ग्राह्य धरण्‍यात येणार आहेत. पीक नुकसानीचे जिओ टॅग असलेले फोटो नसल्‍यास पीकविमा कंपनीकडून विम्‍याचा दावा खारीज होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. सदरचे पंचनामे हे विहित नमुन्‍यात करणे आवश्‍यक असून त्‍यासोबत प्रत्‍येक शेतकऱ्यांच्‍या पीक नुकसानीचे जिओ टॅग (Geo tagged) फोटो काढण्‍याच्‍या सूचना देण्‍यात येत आहेत. कृषी आयुक्‍त यांच्याकडून प्राप्‍त विहीत पंचनाम्‍याच्‍या नमुन्‍यात शेतकऱ्यांचे नाव, शेतकऱ्याची सही आदी बाबी नमूद असलेला पंचनामा आवश्‍यक असल्‍याचे कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance in obtaining these for loss of farm