सहायक अभियंता, हेल्पर लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

महावितरणचे खांब बसवून देण्यासाठी १५ हजारांची लाच
नांदेड-कंधार - नादुरुस्त झालेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब उभारण्यासाठी पंधरा हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या सहायक अभियंता व हेल्पर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या दोघांवर कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यातील मानसपुरी येथील शेतकऱ्यांच्या शेत सर्व क्रमांक १०५ ‘बी’मधील विजेचे दोन खांब नादुरुस्त झाले होते. या शेतकऱ्याने कंधार येथील महावितरणच्या कार्यालयात नवीन खांब बसवून देण्याची मागणी केली; परंतु हे खांब बसविण्यासाठी येथील सहायक अभियंता पराग सुरेश काकडे यांनी २५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती ही लाच १५ हजारांवर देण्याचे ठरले. लाच देण्याची इच्छा नसल्याने या शेतकऱ्याने १७ मे रोजी नांदेड गाठले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे १८ मे रोजी या प्रकरणाची पडताळणी केली. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने सोमवारी (ता. २२) कंधार महावितरणच्या कार्यालय परिसरात सापळा लावला.

सायंकाळी चार वाजता पराग काकडे यांच्या सांगण्यावरून त्यांचा हेल्पर शेख दावलशहा साहिबशहा यांनी तक्रारदारांकडून १५ हजारांची लाच स्वीकारली. त्यांना लगेच या पथकाने पकडले. पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिद्धार्थ माने, दयानंद सरवदे, पोलिस नायक व्यंकट शिंदे, शेख असलम, सुरेश पांचाळ, शेख मुजीब यांनी परिश्रम घेतले.

Web Title: assistant engineer & helper arrested in bribe