...अन्‌ असहाय शेख अथर बोलू लागले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेले चार ते पाच दिवस उपाशी विव्हळत असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला ‘सकाळ’च्या बातमीनंतर एमजीएम रुग्णालयाने उपचार सुरू केलेच; शिवाय त्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यात कर्मचारी गुंतल्याने ते आता रुग्णालयाचे पाहुणे झाले; तसेच आता ते हळूहळू बोलत आहेत.

औरंगाबाद - मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेले चार ते पाच दिवस उपाशी विव्हळत असलेल्या असहाय ज्येष्ठ नागरिकाला ‘सकाळ’च्या बातमीनंतर एमजीएम रुग्णालयाने उपचार सुरू केलेच; शिवाय त्यांची कुटुंबासारखी काळजी घेण्यात कर्मचारी गुंतल्याने ते आता रुग्णालयाचे पाहुणे झाले; तसेच आता ते हळूहळू बोलत आहेत. 

प्रचंड उष्णतेने कहर केलेला असतानाच मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर गेल्या आठवड्यात असहाय व्यक्ती चार ते पाच दिवस मरणासन्न अवस्थेत पडून होती. शेख अथर (निजामाबाद) असे तिचे नाव आहे. उपचारानंतर आता अथर हळूहळू बोलू लागले आहेत. त्यांची कंबर मोडल्याने त्यांना हालचाल करता येत नव्हती. अन्न मिळत नसल्याने ते एकाच जागेवर मरणासन्न अवस्थेत पडून होते. जाणारे येणारे प्रवासी त्यांच्याकडे ओशाळलेल्या नजरेने पाहत होते. मदतीला मात्र कुणी धावत नव्हते. अशातच रेल्वेचे तिकीट बुकिंग कर्मचारी गोविंद पुंडगे यांनी माहिती देऊनही पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका सेवेने दखल घेतली नव्हती. याबाबतचे ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेले वृत्त सोमवारी (ता. २९) ‘एमजीएम’चे विश्‍वस्त अंकुशराव कदम यांनी वाचले. त्यानंतर तत्काळ एमजीएमच्या ओपीडीचे प्रमुख नारायण पाटील, वॉर्डबॉय बळीराम आपार, विशाल दळे, अफसर पटेल ऊर्फ बाबूभाई यांनी अथर यांना रुग्णावाहिकेतून थेट ‘एमजीएम’मध्ये आणून दाखल केले.

‘एमजीएम’चे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी या प्रकरणात विशेष लक्ष दिले. अथर यांच्या कंबरेला दुखापत झालेली आहे. म्हणून त्यांच्यावर अस्थिव्यंग वॉर्डात उपचार सुरू आहेत. डॉ. गिरीश गाडेकर, डॉ. बी. के. सोमाणी हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. वॉर्डातील कर्मचारी कडूबाई सरोदे व कर्मचारी त्याची कुटुंबासारखी काळजी घेत आहेत. दोनवेळ भोजन आणि अंडी असा सध्या त्यांचा खुराक रुग्णालयाने सुरू केला आहे.

रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते; तसेच रुग्णालय प्रशासनाने त्यांची दाढी करून केसही कापले आहेत. आणखी काही दिवस रुग्णालयात उपचार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भुकेने व्याकुळ असलेले अथर आता हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘सकाळ’ने ही बातमी निदर्शनास आणून दिली. म्हणून त्या रुग्णावर उपचार करता आले. रुग्णालयात संपूर्ण यंत्रणा आहे. म्हणूनच ‘एमजीएम’ने पुढाकार घेतला. या व्यक्तीला जीवदान मिळण्याचे श्रेय ‘सकाळ’चेच आहे. 
- अंकुशराव कदम, विश्‍वस्त, एमजीएम रुग्णालय.

Web Title: Athar Shaikh Talking Life Sakal Impact