हे कसले अच्छे, हे तर "बुरे दिन'!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

सलग तिसऱ्या दिवशी 'एटीएम'मध्ये ठणठणाट, रिझर्व्ह बॅंकेकडून चलनाचा पुरवठा बंद

सलग तिसऱ्या दिवशी 'एटीएम'मध्ये ठणठणाट, रिझर्व्ह बॅंकेकडून चलनाचा पुरवठा बंद
औरंगाबाद - आठ नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी झाली त्याला सोमवारी (ता. 8 मे) सहा महिने पूर्ण झाली. जानेवारी ते मार्चदरम्यान नोटाबंदीचा परिणाम काही अंशी ओसरला होता. मात्र, एटीएम व बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा संपुष्टात आल्यानंतरही सर्वजण "कॅशलेस' होऊ लागले. ऐन उन्हातदेखील एटीएमची शोधाशोध करून पैसे काढण्याची कसरत नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे "हे कसले अच्छे दिन, हे तर बुरे दिन' असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्‍त होत आहेत.

नाव न सांगण्याच्या अटीवर भारतीय स्टेट बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की नोटाबंदीदरम्यान काही प्रमाणात रिझर्व्ह बॅंकेकडून नव्या चलनी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरू होता; मात्र मार्चनंतर रिझर्व्ह बॅंकेकडून केवळ एकवेळा शंभर कोटी रुपये पाठविण्यात आले. त्याव्यतिरिक्‍त रिझर्व्ह बॅंकेकडून हवा तितक्‍या प्रमाणात चलन पुरवठा झाला नाही. प्रामुख्याने प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सेवानिवृत्ती वेतन, मासिक पगार आणि विविध देयकांपोटी बॅंकांना रोख रकमेची आवश्‍यकता भासते. अशा वेळी बॅंका आपल्या ग्राहकांसाठी पैसे राखून ठेवतात. आपल्या ग्राहकांना त्रास होऊ नये, यासाठी "एटीएम'ला पैसे देण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे 15 मेपर्यंत एटीएममध्ये पैसे मिळण्याची शक्‍यता धूसरच आहे. त्याव्यतिरिक्‍त खासगी बॅंका आपल्या ग्राहकांसाठी एटीएममध्ये पैसे भरतात; परंतु त्यांनी फक्‍त आपल्याच खातेधारकांसाठी एटीएम सुविधा सुरू ठेवली आहे. दुसऱ्या बॅंकेच्या एटीएमने पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे एटीएम कार्ड ग्राह्य नसल्याचा संदेश स्क्रीनवर दिसतो. त्यामुळे कोणतेही एटीएम कुठेही चालते, हा गैरसमज असल्याची चर्चा एटीएमधारकांमध्ये आहे.

करन्सी चेस्ट रिकाम्या
औरंगाबादमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया आणि एचडीएफसीच्या चार करन्सी चेस्ट आहेत. भारतीय स्टेट बॅंक वगळता अन्य बॅंका आपल्या पुणे, नाशिक, जळगाव अथवा मुंबईच्या मुख्य कार्यालयातून पैसे ऍडजेस्ट करताहेत. या सर्व बॅंकांच्या नजरा रिझर्व्ह बॅंकेकडे असून, ग्रामीण भागात दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी एटीएम सुरू दिसले की लगेचच पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. औरंगाबादमधील एकूण सातशेपैकी सहाशेपेक्षा अधिक एटीएम सोमवारी बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atm empty in aurangabad