जालन्यात एटीएमला आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

जालना - पोस्ट ऑफिस रोडवरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम रूमला शुक्रवारी (ता. तीन) सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत फर्निचर, एसी, संगणक व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले.

जालना - पोस्ट ऑफिस रोडवरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम रूमला शुक्रवारी (ता. तीन) सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत फर्निचर, एसी, संगणक व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले.

पोस्ट ऑफिस रोडवर स्टेट बॅंकेच्या शाखेला लागूनच समोरील बाजूस बॅंकेने एटीएम व पैसे भरण्यासाठी मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी एटीएममधून धूर येत असल्याचे पाहिले. एटीएम रूमला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी बाजूलाच असलेल्या क्रमांकावर संपर्क करीत अग्निशमन दलास कळविले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी पोचला.

अग्निशनम दलाचे डी. एम. जाधव, गणपत काटकर, सूरज काळे, सादिक अली, आर. के. बनसोडे, शेख रशीद आदींनी अर्ध्या तासात आग आटोक्‍यात आणली. या आगीत यूपीएस, एसी, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, फर्निचर यांचे मोठे नुकसान झाले. वेळेत आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे बॅंकेच्या शाखेचे नुकसान टळले. एटीएम व सीडीएमलाही आगीच्या झळा बसल्या. आगीमुळे मशीनमध्ये असणाऱ्या अंदाजे एक लाख रुपयांच्या नोटांचे नुकसान झाल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत बॅंकेचे व्यवस्थापक उल्हास गोसावी यांनी सांगितले, की एटीएमला लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती औरंगाबादच्या मुख्य शाखेस दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एटीएमची तपासणी केली. दरम्यान, या घटनेची सदर बाजार पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.

सुरक्षा रक्षक नाही
स्टेट बॅंकेच्या या एटीएम मशीनला आग लागली तेव्हा तिथे सुरक्षा रक्षक नव्हता. याबाबत व्यवस्थापक श्री. गोसावी म्हणाले, की स्टेट बॅंकेच्या बहुतांश एटीएमचे सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही.

Web Title: atm fire jalna