एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर.....

प्रकाश बनकर
रविवार, 22 डिसेंबर 2019

शहरातील एटीएम, सीडीएम मशीन बंद असल्याचे दिसून येत आहे. बॅंकांनी नेमलेल्या कंत्राटदाराने एटीएम रिपेरिंगची सर्व काम करणे अपेक्षित आहे; मात्र कंत्राटदार कंपनीकडे प्रत्येक तालुक्‍यासाठी केवळ एक इंजिनिअरची नियुक्ती केली आहे. जास्त वापर असणारे एटीएम, सीडीएम मशीन वारंवार बंद पडत असतात.

औरंगाबाद: काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने एटीएम लुटीच्या, चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून बॅंकांवर कडक निर्बंध लादले होते. नवीन निर्बंधामुळे बॅंकांना एटीएमसाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अनेक एटीएम बंद केले. सुरू असलेले एटीएम सांभाळण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक केली. खासगी कंत्राटदारांकडून एटीएम सेवा सुरळीत ठेवण्यात अपयश येत असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

आरबीआयच्या नियमानुसार सर्व एटीएम मशीनमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस, वायरलेस कम्युनिकेशन आणि हुटर्स, सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. पैशांची ने-आण करणाऱ्या व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. तसेच एटीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या रक्कम वाढवावी लागणार आहे. असे विविध नियम लागू झाल्याने बॅंकांना आपले एटीएम मशीन सांभाळण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. सध्यातरी बॅंका हा अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करण्यासाठी तयार नाही. औरंगाबाद शहरात विविध बॅंकांचे जवळपास तीनशेवर एटीएम आहेत. यातील अर्ध्यावर एटीएमवर सुरक्षारक्षक नसल्याने दिसून येते. बॅंकाची शाखा असलेल्या ठिकाणीच एटीएमवर सुरक्षारक्षक नेमले आहेत. 

हेही वाचा : पिसादेवीकरांना महिनाभरात जायकवाडीचे पाणी 

एटीएमची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर
बॅंक आणि एटीएम अशा दुहेरी सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. प्रत्येक एटीएमवर सुरक्षारक्षक विविध सुविधा देण्यासाठी बॅंकांना अतिरिक्त खर्च हा बॅंकांना परवडणारा नाही. दुसरीकडे बॅंकांचे एनपीएचे प्रमाण वाढल्याने आरबीआयच्या नियमानुसार सुविधा देणे अशक्‍य असल्याने बॅंकांनी एटीएमची जबाबदारी खासगी कंत्राटदारांवर देण्यात आली. तसेच काही बॅंकांनी एटीएम सांभाळण्यासाठी खासगी कंत्राटदार नेमले आहेत. त्यामुळे शहरातील मोजके एटीएम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक बातमी : समुहशेती राबवणारे धनगरवाडी ठरतेय आदर्श गाव 

कर्मचारी संख्या कमी ​

गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आपले एटीएम सेवा बंद केली आहे. बॅंकांच्या संलग्नीकरणानंतर प्रत्येक बॅंक शाखेत खातेदारांची संख्या लाखांवर पोचली. त्याच्या तुलनेत कर्मचारी संख्या अत्यंत कमी झाल्याने ग्राहकांना सेवा देणे बॅंक कर्मचाऱ्यांना अशक्‍य होत आहे. दुसरीकडे एनपीएचा आलेख वाढत चालल्याने बॅंकांनी यावर उपाय म्हणून एटीएमवरील अतिरिक्त खर्च कमी व्हावा यासाठी खासगी कंत्राटदारांना एटीएम सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. 

हेही वाचा ः औरंगाबादेत शांततेचे वातावरण

एटीएम, सीडीएम मशीन वारंवार बंद
शहरातील एटीएम, सीडीएम मशीन बंद असल्याचे दिसून येत आहे. बॅंकांनी नेमलेल्या कंत्राटदाराने एटीएम रिपेरिंगची सर्व काम करणे अपेक्षित आहे; मात्र कंत्राटदार कंपनीकडे प्रत्येक तालुक्‍यासाठी केवळ एक इंजिनिअरची नियुक्ती केली आहे. जास्त वापर असणारे एटीएम, सीडीएम मशीन वारंवार बंद पडत असतात. त्यामुळे ते दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदारांना जास्त कालावधी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM security winds down in Aurangabad