हिमतीने जबाब देत ‘ती’ने मिळविला न्याय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

‘ती’ ठाम राहिली
या प्रकरणातील मुलीला न्यायालयाच्या आदेशानुसार अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे. संपूर्ण खटल्यामध्ये मुलीने विपरीत परिस्थितीवर मात करीत मोठ्या हिमतीने जबाब दिला व गरजेनुसार वेळोवेळी न्यायालयात हजेरी लावली. सध्या ही मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत असल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद - १४ वर्षीय मुलीची आई भोळसर, तर वडिलांचे निधन झालेले. दरम्यान, मुलीला दत्तक घेऊन तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या ६० वर्षीय नराधम पित्याला दहा वर्षे सक्तमजुरी व साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली. प्रकरणातील पीडित मुलीला पित्याने ठार मारण्याची धमकी दिली असतानाही मुलीने हिमतीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली, हे विशेष. बाबूल खान पठाण (रा. औरंगाबाद जिल्हा) असे आरोपी पित्याचे नाव आहे.

याप्रकरणी तेव्हा इयत्ता सातवीत शिकत असलेल्या पीडित मुलीने फिर्याद दिली होती. त्यानुसार खान व त्याच्या पत्नीने संबंधित मुलीला दत्तक घेतले होते. १६ डिसेंबर २०१६ रोजी रात्री मुलगी झोपली असता, घरी कोणीच नसल्याची संधी साधत खानने तिला ठार मारण्याच्या धमक्‍या देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्याने अत्याचार केला व कुणाला सांगितल्यास मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यापूर्वीही त्याने तिला त्रास दिला होता. 

धमकीला न घाबरता दिली फिर्याद 
पित्याच्या सततच्या छळाला कंटाळून मुलीने १८ डिसेंबर रोजी बिडकीन पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील उल्हास पवार यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सक्तमजुरी, तर इतर कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

 अत्याचार करणाऱ्या पित्याला दहा वर्षे सक्तमजुरी 
 दत्तक घेतलेल्या मुलीवर वारंवार करायचा अत्याचार 
 अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांचा निकाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocity Girl Father Crime Justice