भय इथले संपत नाही!

मनोज साखरे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

महिलांशी संबंधित यापूर्वीच्या गंभीर घटना

  • गोलवाडी निर्जनस्थळी २१ सप्टेंबर २०१५ ला सामूहिक अत्याचार.
  • सुंदवाडी येथील निर्जनस्थळी २७ ऑगस्ट २०१५ ला तरुणाला मारहाण, त्याच्या मैत्रणीवर सामूहिक अत्याचार.
  • छेडछाडीमुळे श्रुतीनामक तरुणीची २० ऑगस्ट २०१५ ला आत्महत्या.
  • एका नामांकित शाळेतील मुलीवर रिक्षाचालकाकडून अत्याचार.

औरंगाबाद - मेट्रो सिटीत अत्याचाराच्या घटना वाढत्याच असताना औरंगाबाद शहरातही अत्याचाराचे प्रकार घडतच आहेत. सुंदरवाडी असो, की गोलवाडी. बहुतांश परिसरातील निर्जनस्थळी धाकदडपशाहीने अत्याचाराचे प्रकार घडले. काही अत्याचार नात्यातील व्यक्तींकडून, तर काहींबाबत आमिषाने अत्याचार व नंतर फसवणुकीचे प्रकार घडले. औरंगाबादेत ६४ महिन्यांत तब्बल ३६० बलात्काराचे प्रकार घडले असून, छेडछाड व विनयभंग तर नित्याचेच झाले आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरण गाजत असतानाच मुंबईतही एका मुलीवर अत्याचाराचा प्रकार घडला. शहरात अनेक ठिकाणी अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. यातील बहुतांश नात्यातील व ओळखीतील व्यक्तींनी अत्याचार केल्याचे तक्रारीवरून दिसते. तरीही अत्याचार झाला हे नक्कीच. यातील मोजकी प्रकरणे सोडल्यास उर्वरित बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयितांचा छडाही लागला; परंतु अत्याचार, छेडछाडीचे प्रकार थांबलेले नाहीत. 

विशेषत: न्यायालयाने निर्जनस्थळावर उपायांबाबत निर्देशही दिले होते. त्यात काही अंशी प्रयत्नही पोलिसांनी केले असले, तरी सद्यःस्थितीत निर्जनस्थळावर ठोस उपाय झालेले नाहीत.

अशी घ्यावी खबरदारी
सामूहिक अत्याचार - शक्‍यतो निर्जनस्थळी, पर्यटनस्थळी जोडपी जातात. एकांत हवा म्हणून उशिरापर्यंत थांबतात; परंतु नंतर पाळत ठेवणारे तेथील टवाळखोरांच्या कचाट्यात सापडल्यानंतर अत्याचाराची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे निर्जनस्थळी जाणे टाळावे, चारचौघांसोबत जाणे श्रेयस्कर ठरेल.

नातलगाकडून अत्याचार - फारशी भक्कम कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसलेली एकटी, असहाय महिला टार्गेट होण्याची जास्त शक्‍यता असते. नात्याचा दुरुपयोगही घेतला जाऊ शकतो. एकूण अत्याचारापैकी नात्यातील, ओळखीतील व्यक्तींकडून अत्याचाराचीच संख्या मोठी आहे. अशावेळी काळजी घ्यावी, हेतूचे निरीक्षण करावे.

लग्नाच्या आमिषातून फसवणूक - फेसबुक इतर सोशल साईटवरून ओळख, जवळीक, मैत्रीचा देखावा, लग्नाचे आमिष आणि नंतर लैंगिक शोषण असे प्रकार घडतात. या गोष्टींतून सावधानता बाळगलेली बरी, आक्षेपार्ह कृत्याच्या शक्‍यतेआधीच अशांशी संपर्क टाळलेला बरा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocity Girl Women Rape Crime Danger