'ऍट्रॉसिटी'ची कडक अंमलबजावणी करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

लातूर - ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (ता. 28) व्ही. एस. पॅंथर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनता यात सहभागी झाली होती. मुस्लिम संघटनाही यात सहभागी झाल्या होत्या. महिला व मुलींची संख्या लक्षणीय राहिली. 

लातूर - ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (ता. 28) व्ही. एस. पॅंथर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनता यात सहभागी झाली होती. मुस्लिम संघटनाही यात सहभागी झाल्या होत्या. महिला व मुलींची संख्या लक्षणीय राहिली. 

व्ही. एस. पॅंथर्सचे अध्यक्ष विनोद खटके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरवात झाली. यानिमित्ताने "जय भीम‘चा नाराही शहरात घुमला. आंबेडकर चौक, गंजगोलाई, गांधी चौक, शिवाजी चौक मार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी झाली होती. "परिवर्तन लढ्यासाठी सामील व्हा‘, "कोपर्डी अत्याचार किती दिवस‘, "जातिअंताची लढाई झालीच पाहिजे‘, "ऊठ बहुजना जागा हो, ऍट्रॉसिटीचा धागा हो‘, "बंद करा, बंद करा, जातीयवाद बंद करा‘, "आरक्षण हमारा हक है, वो हमे मिलनाही चाहिये‘ आदी घोषणा फलक महिलांच्या हातात होते. मोर्चात महिला व मुलींची संख्या मोठी होती. या मोर्चात मुस्लिम संघटनाही सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे मोर्चात निळ्या व हिरव्या झेंड्यांचा संगम पाहायला मिळाला. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, राज्यभरातील सर्व तंटामुक्त गाव समित्या बंद कराव्यात, ऍट्रॉसिटीची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मुस्लिम समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे, गोरक्षकांच्या नावावर मुस्लिमांवर होणारे अत्याचार बंद करावेत, स्वयंघोषित गोरक्षकांवर कार्यवाही करावी, मागासवर्गीय व मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारामुळे स्वसंरक्षणासाठी विनाअट शस्त्र परवाने द्यावेत, पानसरे व कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा तपास निःपक्षपातीपणे करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात सचिन मस्के, अमोल सुरवसे, अमोल कांबळे, सादिक शेख, जफर कुरेशी, नीलेश कांबळे, विशाल गायकवाड, किरण पायाळ, प्रतीक कांबळे, पंकज होळकर, अजय बनसोडे, महेश कांबळे, अजय चक्रे, लक्ष्मण कांबळे, असद शेख, शरद किणीकर, अतुल होळकर, ईलाही शेख, सिद्धार्थ वाघचौरे, नितीन सोनवणे आदी सहभागी झाले होते.मुस्लिमांच्या आरक्षणाचीही मागणी 
या मोर्चात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता सहभागी झाली होती. या मोर्चात ऍट्रॉसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसोबतच मुस्लिम समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, ही मागणीदेखील प्रामुख्याने करण्यात आली.

Web Title: atrocity strict implementation