औरंगाबाद - ऑक्सिजन हबवर महापालिकेचा हल्ला

संकेत कुलकर्णी
मंगळवार, 19 जून 2018

औरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत जेसीबीने खड्डे करून वाहने कचरा आणून ओतत आहेत.

औरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत जेसीबीने खड्डे करून वाहने कचरा आणून ओतत आहेत.

आंबा, चिंच, जांभळाच्या मोठाल्या फळबागा, विविध लहानमोठ्या पक्ष्यांसह मोरांचेही निवासस्थान आणि शहराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारे एक ओऍसिस असलेल्या हिमायतबागेला आधीच चोहोबाजूंनी अतिक्रमणाचा वेढा पडलेला आहे. त्यात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या झुंडींमुळे मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता तर महापालिका या बागेचा उकिरडा करण्याच्या कामी लागली आहे. आमखास मैदानाकडून वर जाणाऱ्या रस्त्यालगत किलेअर्कच्या तटामागील मोकळ्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने मोठाले खड्डे करून त्यात कचरा दाबणे सुरू केले आहे. यात प्लास्टिक, कागद, काचेच्या बाटल्या, रॅपर्स असा अविघटनशील कचराही मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय या भागातील लोकांनीही निरुपयोगी बांधकाम साहित्याचे ढीगच्या ढीग इथे आणून ओतले आहेत. पशुपालनाचा व्यवसाय करणारेही शेण टाकण्यासाठी ही जागा वापरतात. कालांतराने शेणखत विक्री करतात. या भागात हिमायतबाग प्रशासनाने घातलेली संरक्षक भिंत फोडून हे उद्योग सुरू आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या
शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या झाल्या आहेतच; पण या भागात कचरा, मेलेली जनावरे आणून टाकल्यामुळे त्यावर पोसलेली कित्येक कुत्री हिमायतबागेत धुडगूस घालत असतात. हेच कुत्रे येथील मोरांचे लचके तोडत असल्याकडे 'सकाळ'ने यापूर्वीही लक्ष वेधले होते. पण महापालिकेने आता इथेच अधिकृत उकिरडा सुरू केल्यामुळे हा धोका आणखी वाढणार आहे.

कंपोस्टिंग पिटचे नाटक
ओला कचरा दाबून त्याचे खत करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कंपोस्टिंग पिटमध्ये कसलीही वर्गवारी न करता सर्रास ट्रक रिचवले जातात. उकिरड्यांवर कंपोस्ट खत निर्मिती केली जात असल्याचे दाखवण्यासाठी केवळ एक लोखंडी पिंजरा आणून ठेवला जातो. तो लहानसा कृत्रिम पिट कचऱ्याने ओसंडून वाहू लागल्यानंतर कुणी त्याकडे लक्षही न देता त्याभोवती कचऱ्याचे ढीग घातले जातात. हिमायतबागेत आता हेच सगळे सुरू झाले आहे.

Web Title: attack of municipal corporation on oxygen hub from aurangabad